नवी मुंबईमध्ये (Navi Mumbai) बलात्काराची खोटी तक्रार दाखल करुन खंडणी (Extortion) मागितल्याप्रकरणी एका 19 वर्षीय महिलेसह चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींमध्ये महिलेची आई, भाऊ, काका आणि एका सामाजिक कार्यकर्त्याचा समावेश आहे. बलात्काराची तक्रार दाखल केलेल्या 43 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या कुटुंबाकडून अडीच लाख रुपये स्वीकारल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे.
पीडित व्यक्तीच्या अंथरुणाला खिळलेल्या आईची काळजी घेण्यासाठी या महिलेला कामावर ठेवले होते. 18 ऑक्टोबर रोजी पीडित व्यक्ती महिलेला खरेदीसाठी सोबत घेऊन गेला होता. तिथे तिला गुंगीचे औषध असलेले अन्न देण्यात आले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, असे 25 ऑक्टोबर रोजी नोंदवलेल्या तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीनुसार कारवाई करत पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली होती. दरम्यान, आरोपीच्या पत्नीला आलेल्या सामाजिक कार्यकर्त्याच्या कॉलमुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपीच्या पत्नीने एका सामाजिक कार्यकर्त्याचा कॉल आला. त्या कॉलवर पतीवरील बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी 14 लाख रुपयांची मागणी पत्नीकडे करण्यात आली. मात्र या कॉलबद्दलची माहिती आरोपीच्या पत्नीने पोलिसांना दिली. तसंच सामाजिक कार्यकर्त्याशी झालेल्या संभाषणाची रेकॉर्डिंग सुद्धा तिने पोलिसांना दाखवली. पोलिसांनी सापळा रचून सामाजिक कार्यकर्ता, महिला, तिची आई, भाऊ आणि काका यांना आरोपीच्या पत्नीकडून 2.50 लाख रुपये स्वीकारताना पकडले.
पोलिसांना 18 ऑक्टोबरच्या घटनांबद्दल महिलेच्या कथेमध्ये त्रुटी देखील आढळल्या. ती बेशुद्ध झाली होती हा तिने केलेला दावा सीसीटीव्ही फुटेजनुसार चुकीचा ठरत होता. ते ज्या दुकानात गेले होत त्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजने वेगळेच चित्र समोर येत होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती नाश्ता करताना दिसत आहे. परंतु, ती बेशुद्ध झाली नव्हती अशी माहिती सीनियर इन्स्पेक्टर रवींद्र पाटील यांनी दिली. (Mumbai: 16 वर्षीय दिव्यांग मुलीवर उपचाराच्या नावाखाली वर्षभर बलात्कार; आरोपी डॉक्टर अटकेत)
त्यानंतर ते एका कटलरीच्या दुकानात गेले. पीडित व्यक्तीच्या आईची काळजी घेण्यासाठी ही महिला त्यांच्या घरीच राहणार होती. तिथे राहण्यासाठी तिला लागणारी गादी घेण्यासाठी ते दोघे तिच्या भावाच्या घरी गेले. महिलेच्या कथेनुसार नाश्ता केल्यानंतर ती बेशुद्ध पडली आणि तासाभरानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला. या संपूर्ण प्रकारात ती कुठेही बेशुद्ध पडलेली दिसत नव्हती याचा अर्थ ती खोटे बोलत होती. पीडित व्यक्तीवर दाखल करण्यात आलेला बलात्काराचा गुन्हा रद्द करण्यासाठी पोलिस लवकरच कोर्टात धाव घेणार आहेत, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.