Navi Mumbai: थ्री-स्टार हॉटेलमध्ये 8 महिने राहिल्यानंतर 25 लाखांचे बिल चुकते करण्यापूर्वी बापलेक फरार
Representational Image |(Photo Credits: Pixabay)

नवी मुंबई (Navi Mumbai) मधील एका थ्री स्टार हॉटेल (Three Star Hotel) मधून लाखो रुपयांचे बिल न भरता बापलेक फरार झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. खारघर (Kharghar) मधील एका हॉटेलमध्ये 8 महिने राहिल्यानंतर एका व्यक्तीचे बिल तब्बल 25 लाख रुपये झाले. मात्र ते न  भरता तो मुलासह बाथरुमच्या खिडकीतून पळून गेला. मुरली कामत (43) यांनी आपल्या 12 वर्षीय मुलासोबत 8 महिन्यांपूर्वी हॉटेलमध्ये चेक-इन (Check-in) केले होते. ते अंधेरीचे (Andheri) निवासी होते. याप्रकरणी हॉटेल मॅनेजमेंटने पोलिसांत धाव घेतली असून त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Betting App द्वारे नवी मुंबई मधील सिनेमा निर्मात्याची 1.35 लाखांना फसवणूक)

हॉटेल स्टाफने दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी 23 नोव्हेंबर रोजी कामत यांनी 12 वर्षीय मुलासोबत चेक इन केले होते. तेव्हा त्यांनी दोन रुम्स बुक केल्या होत्या. त्यात एक बिजनेस मिटिंगसाठी आणि दुसऱ्या रुममध्ये ते आपल्या मुलासह राहत होते. मात्र त्यावेळेस त्यांनी कोणतेही पेमेंट केले नाही. एका महिन्यानंतर पैसे भरतो असे सांगून त्यांनी आपला पासपोर्ट सिक्युरिटी म्हणून हॉटेलमध्ये जमा केला होता. (Navi Mumbai: सायबर गुन्हेगारांकडून नेरुळ मधील महिलेची 13 लाखांना फसवणूक)

17 जुलै रोजी हॉटेलमधील सफाई कर्मचारी रुम साफ करण्यासाठी गेला. तेव्हा रुममध्ये कोणीच नसल्याचे त्याच्या निर्दशनास आले. त्याने तात्काळ मॅनेजरला त्याबाबत माहिती दिली. रुमची तपासणी केली असता बापलेक बाथरुमच्या खिडकीत पळून गेल्याचे त्यांना समजले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिस याप्रकरणाचा तपास करत असून आरोपीचा शोध घेत आहेत.