नवी मुंबई (Navi Mumbai) मधील एका महिलेला सायबर गुन्हेगारांनी (Cyber Criminals) तब्बल 13.29 लाखांचा गंडा घातला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, या पीडित महिलेची जुलै महिन्यात फेसबुकद्वारे डॉ. मार्क जॉन नामक व्यक्तीशी ओळख झाली होती. त्यानंतर या पीडित महिलेला वाढदिवसानिमित्त 37 लाख युएस डॉलर सोन्याचे दागिने, चामड्याचे शूज आणि बॅग्स पाठवण्याचे आमिष आरोपीने दाखवले. आरोपीची सहकाऱ्यांनी एजेंट बनून महिलेशी ओळख केली आणि त्यानंतर थोडी थोडी रक्कम त्यांच्या अकाऊंटला ट्रान्सफर करायला लावली. मागील आठवड्यात नेरुळच्या (Nerul) 70 वर्षीय महिलेने 10.64 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली.
12 जुलै रोजी आरोपी व्यक्तीने पीडित महिलेला व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल केला होता. या व्हिडिओ कॉलमध्ये महिलेच्या बर्थडे निमित्त घेतलेले खूप सारे डॉलर्स, सोने, घड्याळ आणि चामड्याच्या वस्तू त्याने महिलेला दाखवल्या. या सर्व वस्तू तिच्या घरी पोहचवण्यासाठी एक एजेंट तिला मदत करेल, असेही सांगितले. 13 जुलै रोजी महिलेला ऋषी झा नामक एजंटने संपर्क केला आणि या सर्व वस्तू तिच्या घरी पोहचवण्यासाठी 29,000 रुपयांचे कुरियर चार्जेस बँकमध्ये ट्रान्सफर करुन घेतले.
त्यानंतर 15 जुलै रोजी फॉरन एक्सजेंचच्या नावाखाली 1.5 लाख रुपये बँकमध्ये ट्रान्सफर करुन घेतले. यानंतर जय शाह आणि सुमित मिश्रा या दोन इतर एजेंट्सने पीडित महिलेला संपर्क करुन तिच्याकडून टॅक्सच्या नावाखाली तिच्याकडून 6.5 लाख रुपये ट्रान्सफर करुन घेतले. यानंतर 17 जुलै रोजी इंटरनॅशनल मॉनेटरी सर्टिफिकेट मिळवण्यासाठी शाहने पीडितेला 5 लाख रुपये जमा करण्यास सांगितले. ही रक्कम जमा केल्यानंतर आरोपीने पीडितेला अजून 4 लाख रुपये जमा करण्यास सांगितले. (Online Fraud: पुण्यात 30 वर्षीय तरूणाची Bike-Sharing App वर भरघोस नफा मिळवून देण्याच्या नावाखाली 15 लाखांची फसवणूक)
माझ्याकडचे सर्व पैसे संपले असून हे पैसे मी नंतर देईन, असे पीडितेने एजंट झा ला सांगितले. तुम्हाल सर्व गिफ्ट्स आणि सर्टिफिकेट मिळेल, असे झा ने सांगितल्यावर आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर महिलेने नेरुळ पोलिस स्टेशनमध्ये या संबंधित शुक्रवारी तक्रार दाखल केली.