योगी आदित्यनाथ आणि सय्यद अली अश्रफ (संग्रहित संपादित प्रतिमा)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सहसचिव सय्यद अली अश्रफ (Syed Ali Ashraf) उर्फ ​​भाईसाहब यांनी शनिवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पोलीस आयुक्त आणि गाझियाबादचे उपपोलीस आयुक्त निपुण अग्रवाल यांना कायदेशीर नोटीस पाठवली. धर्मांतराचे (Conversion) आरोप सिद्ध करावे अन्यथा मुंब्रा येथील नागरिकांची माफी मागावी, अशी मागणी या नोटिशीमध्ये केली आहे. अश्रफ म्हणाले, ‘काही दिवसांपूर्वी गाझियाबादचे पोलीस उपायुक्त निपुण अग्रवाल यांनी दावा केला होता की, मुंब्रा येथे ऑनलाइन मोबाइल गेमद्वारे 400 लोकांचे धर्मांतर करण्यात आले.’

ते पुढे म्हणाले, ‘अग्रवाल यांच्या वक्तव्यामुळे स्थानिक नागरिक कमालीचे संतप्त झाले आहेत. या विधानामुळे नागरिकांचा या शहराकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. त्याचे दूरगामी परिणाम येथील नागरिकांना भोगावे लागतील. या वक्त्यव्याबाबत स्थानिक स्तरावर वेगवेगळ्या प्रकारे निषेध व्यक्त केला जात आहे. मी नोटीसमध्ये मागणी केली आहे की, ज्यांनी असे विधान केले त्यांनी एकतर धर्मांतरितांची नावे जाहीर करावी किंवा माफी मागावी.’ फ्री प्रेस जर्नलने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान, गाझियाबाद पोलिसांच्या डीसीपींनी काही दिवसांपूर्वी एक निवेदन दिले होते की, एका कॉलरने त्यांना गाझियाबादप्रमाणेच मुंब्रा येथे 300-400 लोक धर्मांतरित झाल्याची माहिती दिली होती. या कॉलरने धर्मांतराशी संबंधित काही फोटो, व्हिडिओ, ऑडिओ आणि मोबाइल क्रमांक पोलिसांना दिले आहेत. या माहितीची सत्यता पडताळली जाईल. या पार्श्वभूमीवर मुंब्रा पोलीस पुरावे गोळा करण्यासाठी गाझियाबादला पोहोचले आहेत. (हेही वाचा: Maharashtra Politics: राजकारण तापले; प्रकाश आंबेडकरांनी दिली औरंगजेबच्या कबरीला भेट)

दुसरीकडे, महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डीसीपीच्या या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेत गाझियाबाद पोलिसांना आव्हान दिले असून, ‘पोलीस 400 काय, मुंब्य्रातील 2 धर्मांतरे सिद्ध करू शकले तर मी राजकारण सोडेन,’ असे ते म्हणाले होते.