गेल्या अनेक दिवसांपासून धमक्या येत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची भेट घेऊन आपल्या सुरक्षेची (Police Protection) मागणी केली आहे. तसेच भाजप सरकारच्या काळात सुरक्षेची मागणी करूनही आपल्याला सुरक्षा मिळाली नाही. त्यामुळे आता महाविकास आघाडी सरकारकडे सुरक्षेची मागणी करत असल्याचं अमोल मिटकरी यांनी सांगितलं आहे.
अमोल मिटकरी यांनी आपल्या पुढे बोलताना सांगितल की, मागील आठवड्यात प्रहारचे अकोल्याचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांची हत्या करण्यात आली होती. पुंडकर यांची हत्या करणाऱ्या आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. सध्या राज्यात वातारवरण खराब आहे. आम्ही फडणवीस सरकारच्या काळात बंड केलं. राज्यात सध्या विचित्र प्रकार घडत आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे सुरक्षेची मागणी केली आहे, असंही मिटकरी म्हणाले. (हेही वाचा - Muslim Reservation: शिवसेनेकडून मुस्लिम आरक्षणाला समर्थन; एकनाथ शिंदे यांचा नवाब मलिक यांच्या घोषणेला पाठींबा)
यापूर्वी मला अनेकदा धमकीचे फोन आणि मेसेजेस आले. मी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनही दिले होते. परंतु, फडणवीस सरकारच्या काळात यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. आजही मला घराबाहेर पडलं की, असुरक्षित वाटतं. सध्या महाविकास आघाडीच सरकार आहे. त्यामुळे हे सरकार आपल्याला सुरक्षा देईल, असा विश्वासही मिटकरी यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
जितकं काम तितकाच पगार असावा. सरकारी कामकाज करणाऱ्यांमध्ये पोलीस पण येतात, त्यांचा व शेतकऱ्यांचा कामाचा ताण कमी होईल असा एखादा निर्णय होणे गरजेचे. ड्युटी पाच दिवस तर पगार पण पाचचं दिवसाचा. (माझे वैक्तिक मत )@TV9Marathi @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks
— Amol mitkari (@amolmitkari22) February 12, 2020
दरम्यान, राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना येत्या 29 फेब्रुवारीपासून पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. या निर्णयावर अमोल मिटकरी यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवत 'जितकं काम तितकाच पगार' देण्याची मागणी केली होती. सरकारी कामकाज करणाऱ्यांमध्ये पोलीस पण येतात, त्यांचा व शेतकऱ्यांचा कामाचा ताण कमी होईल, असा एखादा निर्णय होणे गरजे आहे. तसेच कामकाज 5 दिवस तर पगार पण 5 दिवसाचाचं दिला पाहिजे, अशी मागणी मिटकरी यांनी केली होती.