नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मालेगाव (Malegaon) येथे एका एसटी कर्मचाऱ्याच्या ((ST Employee) मुलाने आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न केल्याची घटना समोर येत आहे. यापूर्वी राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली होती. त्यात आता या घटनेची भर पडली आहे. उच्च शिक्षण घेण्यास आर्थिक अडचण येत असल्याने आलेल्या नैराश्यातून एसटी चालकाच्या मुलाने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याचा जीव वाचला आहे. परंतु, मुलाने उचललेल्या या पावलामुळे पालकांना जबर धक्का बसला आहे.
वडीलांना कमी पगार असून तो ही वेळेत मिळत नसल्याने घर चालवणे कठीण झाल्याने मुलाने आत्महत्येचा विचार केला. अशा घटना एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे नक्कीच लक्ष वेधतात. तसंच यापूर्वी एसटी कर्मचारी आत्महत्येसारखं पाऊल उचलत आता त्यांची मुलं अशी टोकाची भूमिका घेऊ लागल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. (ST Bus Fare Hike: लालपरीचा प्रवास महागणार; एसटी बसची 17 टक्क्यांनी भाडेवाढ)
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. 29 ऑक्टोबर रोजी अहमदनगरमध्ये एसटी चालकाने आत्महत्या केली. दिलीप हरिभाऊ काकडे असे त्यांचे नाव असून परिवहन महामंडळात चालक म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी ऑगस्ट महिन्यात धुळ्यातील एसटी कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली होती. कमलेश बेडसे असे त्यांचे नाव असून अनियमित पगारामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. या सर्व घटनांवरुन राज्य सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहेत. तर मागण्यांच्या पूर्ततेसाठी एसटी कर्मचारी देखील आंदोलनाचा मार्ग स्वीकारतात.
दरम्यान, एसटी कामगारांना 28 टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता देण्याची घोषणा अनिल परब यांनी दोन दिवसांपूर्वी केली. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. यापूर्वी 12 टक्के असलेला महागाई भत्ता आता 28 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. तर घरभाडे भत्ता 8 टक्के, 16 टक्के आणि 24 टक्के होणार आहे. यापूर्वी तो 7 टक्के, 14 टक्के आणि 21 टक्के असा होता.