नाशिक: इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा; राज्यराणी, पंचवटी एक्सप्रेस चं वेळापत्रक कोलमडलं
Representational Image (Photo Credits: PTI)

मध्य रेल्वेची (Central railway) वाहतूक नाशिक (Nashik) नजिक असलेल्या इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ (Igatpuri Railway Station) रेल्वे रूळाला तडा गेल्याने आज (23 जुलै) सकाळी रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. सकाळी 8.30 च्या सुमारास घडलेल्या या घटनेमध्ये मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 3 च्या रूळाला तडे गेले होते. रेल्वे कर्मचार्‍यांच्या ही गोष्ट त्वरीत लक्षात आल्याने त्यांना मध्य रेल्वेने काही काळ या रेल्वेमार्गावरील वाहतूक थांबवली होती. मात्र कालांतराने प्लॅटाफॉर्म क्रमांक 4 वरून वाहतूकीला मार्ग मोकळा करण्यात आल्याने आता ही वाहतूक पुन्हा धीम्या गतीने सुरू करण्यात आली. त्यामुळे वाहतूक ठप्प नसून धीम्या गतीने सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मध्य रेल्वेकडून तडा गेलेल्या रूळाचे काम पूर्ण करण्यास, हे रूळ बदलण्यास अद्याप दीड ते 2 तासांचा अवधी लागू शकतो. त्यामुळे नाशिक मार्गावरून धावणार्‍या मध्य रेल्वेच्या राज्यराणी आणि पंचवटी एक्सप्रेसला उशिर होत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अचानक रूळाला तडा गेल्याने यामार्गावरील प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे. राज्य राणी एक्सप्रेसला सुमारे तासभर उशिर झाला आहे.