Coronavirus (Photo Credits: Twitter)

राज्यातील कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग आटोक्यात येत असताना आता नाशिक (Nashik) मधून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. नाशिक मधील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील 170 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात पोलिस प्रशिक्षणार्थी आणि पोलिस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. यांना नाशिकच्या ठक्कर होम कोविड सेंटर आणि खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, या प्रशिक्षण केंद्रात पोलीस उपनिरीक्षक पदासाठी प्रशिक्षण दिले जात होते. (New Coronavirus Strain: राज्यात 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण होणार; निगेटिव्ह आलेल्या प्रवाशांचा 28 दिवस पाठपुरावा)

कालच नाशिकमध्ये एका तीन महिन्यांच्या बाळाचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. या बाळाला इतर गंभीर आजार असल्याची माहिती समोर आली होती. त्यातच कोरोनाची लागण झाल्याने उपचार दरम्यान बालकाचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेनंतर आता पोलिस प्रशिक्षण केंद्रातील कोरोना बाधितांचा मोठा आकडा  समोर आल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारामुळे नागरिक धास्तावले आहेत. त्यामुळे प्रशासनाकडूनही खबरदारीच्या उपाययोजना राबवल्या जात आहे. ख्रिसमस आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्यातील पालिका हद्दीत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. 5 जानेवारी पर्यंत सुरु राहणाऱ्या या संचारबंदीत नागरिकांना रात्री 11 ते सकाळी 6 दरम्यान घराबाहेर पडता येणार नाही. नाशिक मध्ये देखील या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी नाकाबंदी करण्यात येणार असल्याची माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक कुमार पांडे यांनी दिली आहे. दरम्यान, मुंबईत नाईट कर्फ्यू काळात दुचाकी किंवा चारचाकीने फिरण्यास परवानगी देण्यात आली आहे.

दरम्यान, कालच्या अपडेटनुसार, राज्यात एकूण 54,573  अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. तर एकूण 18,01,700 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 94.51% इतका झाला आहे.