Curfew | Representational Image (Photo Credits: PTI)

Night Curfew in Mumbai: राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. मात्र, नाताळ आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरातील महापालिका क्षेत्रांत 5 जानेवारी पर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत रात्र कर्फ्यू लागू (Night Curfew) लावण्यात आला आहे. मुंबई पोलिसांकडून संचारबंदीदरम्यान नागरिकांना घराबाहेर पडण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र, फक्त गर्दी करू नका, असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे. याशिवाय चारपेक्षा अधिक जण एकत्र जमल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil ) यांनी दिला आहे. पोलिसांकडून देण्यात आलेल्या या सवलतीमुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबईसह राज्यभरातील महापालिका क्षेत्रांत 5 जानेवारी पर्यंत लागू करण्यात आलेल्या रात्र संचारबंदीसंदर्भात नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी नाईट कर्फ्यूची नियमावली नेमकी काय आहे? याविषयी स्पष्टीकरण दिलं आहे. (हेही वाचा - Night Curfew in Pune: पुण्याच्या ग्रामीण भागातही नाईट कर्फ्यू लागू होण्याची शक्यता)

मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी रात्र संचारबंदीसंदर्भात बोलताना सांगितलं की, 'नाईट कर्फ्यूदरम्यान रात्री 11 ते सकाळी 6 या कालावधीत 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी आहे. याशिवाय कर्फ्यू काळात पब, हॉटेल्स, सिनेमागृह रात्री 11 वाजता बंद करणे अनिवार्य असेल. यात केवळ रात्रपाळी असणाऱ्या कार्यालयांना आणि अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कार्यालयांना सुट देण्यात आली आहे.

दरम्यान, नाईट कर्फ्यूदरम्यान नागरिक घराबाहेर पडून दुचाकी किंवा कारने प्रवास करू शकतात. परंतु, कारने प्रवास करताना चारपेक्षा अधिक व्यक्ती नसाव्यात, असंही विश्वास नांगरे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या नव्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारतातदेखील योग्य खबरदारी घेण्यात येत आहे.