नागपूर मधील वर्धा येथे होणार्या 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) अध्यक्षपदी नरेंद्र चपळगावकर (Narendra Chapalgaonkar) यांची निवड करण्यात आली आहे. नरेंद्र चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश आणि संवेदनशील लेखक आहे. न्यायधीश होण्यापूर्वी त्यांनी लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या प्रमुखपदाची देखील जबाबदारी सांभाळली आहे.
सुरेश द्वादशीवार यांचे नाव देखील या अध्यक्षपदाच्या चर्चेमध्ये होते मात्र आज झालेल्या बैठकीमध्ये नरेंद्र चपळगावकर यांनी बाजी मारली आहे. विदर्भ साहित्य संघाचे हे शताब्दी वर्ष आहे. त्याचा योग साधत 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विदर्भात व्हावे, अशी इच्छा महामंडळाची घटक संस्था असलेल्या विदर्भ साहित्य संघाने समोर मांडली होती. यासाठी वर्धा हे नाव संमेलनस्थळासाठी सुचवण्यात आले आणि साहित्य महामंडळानेही त्यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत वर्धा वर शिक्कामोर्तब केले आहे. नक्की वाचा: 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात धार्मिक वाद; परिसंवाद मध्येच बंद पाडला.
दरम्यान या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी माजी खासदार दत्ता मेघे यांच्या नावाची निवड करण्यात आली आहे. संमेलनाच्या संरक्षकपदाची जबाबदारी माजी आमदार सागर मेघे यांनी स्वीकारली आहे.
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षपदाखाली 1878 साली पुण्यात पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. तेव्हापासून ही रीत सुरू आहे.