नारायण राणे यांचा भाजपा पक्ष प्रवेश 1 सप्टेंबरला; महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचेही विलीनीकरण होणार
नारायण राणे (फोटो सौजन्य-फेसबुक)

महाराष्ट्रामध्ये आगामी विधानसभा निवडणूका लक्षात घेता भाजपामध्ये पक्ष प्रवेश करणार्‍यांमध्ये अनेक मोठ्या नेत्यांची नावं होती. आता यामध्ये नारायण राणे (Narayan Rane) यांचा समावेश आहे. येत्या 1 सप्टेंबर दिवशी नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपामध्ये विलीन होणार आहे. त्यासोबतच नारायण राणे भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांचे उपोषण आंदोलनाला नारायण राणे यांनी भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजप प्रवेशाची तारीख जाहीर केली. येत्या 1 सप्टेंबरला मी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले. असे वृत्त देण्यात आले आहे. जून महिन्यात कॉंग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील या बड्या नेत्यानेही कॉंग्रेसला रामराम ठोकत भाजपा पक्षामध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांची देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली.

नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाला त्यांचा मित्रपक्ष शिवसेना कशाप्रकारे साथ देते हे पाहणं आता मोठं उत्सुकतेचं ठरणार आहेत. नारायण राणे सध्या राज्यसभा खासदार आहेत. तर त्यांचा मुलगा नितेश राणे कॉंग्रेस पक्षामध्ये आहे. काही दिवसांपूर्वी भाजपा प्रवेश आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या विलीनीकरणाबद्दल योग्य निर्णय घेतला जाईल याचे संकेत दिले होते. राष्ट्रवादी आमदार अवधूत तटकरे यांनी मातोश्री वर घेतली उद्धव ठाकरे यांची भेट; शिवसेना प्रवेशाबद्दल राजकीय भूमिका अद्याप गुलदस्त्यात

नारायण राणे हे 1999 साली 9 महिन्यांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळेस ते शिवसेना पक्षामध्ये होते. 2005 साली शिवसेनाचे तत्कालीन कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या सोबत मतभेद झाल्याने पक्ष सोडला होता. त्यानंतर नारायण यांनी 2017 साली कॉंग्रेस पक्ष सोडला आणि स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष सुरू केला.