Maharashtra cabinet expansion 2019: Radhakrishna Vikhe Patil, Ashish Shelar (Photo Credits: Twitter/ ANI)

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा (Maharashtra Cabinet Expansion) बहुप्रतीक्षित विस्तार सोहळा आज सकाळी 11 वाजता राजभवनात पार पडला. यावेळी राज्यपाल विद्यासागर राव (Vidyasagar Rao)  यांनी नव्या मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis)  यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये 13 नव्या चेहऱ्यांना स्थान प्राप्त झाले आहे. राज्यात विधानसभा निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपली असताना हा फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार असणार आहे, त्यामुळे यंदा मंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याविषयी उत्सुकता होती.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी विरोधी पक्षातील अनेक मोठ्या नेत्यांनी पक्षांतर्गत वादाचे कारण सांगून भाजपात प्रवेश केला होता.यापैकी अनेक नेत्यांचे आज थेट मंत्रीपदाचे गिफ्ट देऊन सरकारमध्ये स्वागत करण्यात आले.  अलीकडे भाजपात प्रवेश घेतलेले माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. तसेच मुंबईत भाजपची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे आशिष शेलार यांचीही कॅबिनेट मंत्री म्हणून निवड करण्यात आली. राष्ट्रवादीतून काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत आलेले व बीडच्या राजकारणातील वजनदार नेते मानले जाणारे जयदत्त क्षीरसागर यांचीही कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली आहे. शिवसेनेचे विधान परिषद सदस्य तानाजी सावंत यांच्या गळ्यातही कॅबिनेट मंत्रिपदाची माळ पडली आहे.

ANI ट्विट 

उद्या, 17 जून पासून राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत असून त्याआधी हा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार घोषित करण्यात आला आहे. LIVE Maharashtra Cabinet Expansion 2019 Live Update: महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार पूर्ण, पाहा कोणत्या मंत्र्यांची लागली वर्णी

हे आहेत नवे कॅबिनेट मंत्री

राधाकृष्ण विखे पाटील

आशिष शेलार

संजय कुटे

सुरेश खाडे

डॉ. अनिल बोंडे

डॉ. अशोक उईके

जयदत्त क्षीरसागर (शिवसेना)

तानाजी सावंत (शिवसेना)

राज्यमंत्री पदी हे चेहरे

योगेश सागर

अतुल सावे

संजय उर्फ बाळा भेगडे

परिणय फुके

अविनाश महातेकर

आजच्या सोहळ्यात नव्या मंत्र्यांच्या नेमणुकीसोबतच काही जुन्या नावांना मात्र वगळण्यात आले आहे. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, राजे अंबरिश अत्राम, दिलीप कांबळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मंत्रीपदांचे राजीनामे दिले आहेत.