Nandurbar Accident: नंदुरबारमध्ये एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात; एक ठार, बारा जखमी
Accident (PC - File Image)

नंदुरबारमध्ये एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील धुळे-सुरत महामार्गावरील विसरवाडी गावाजवळ शेरे पंजाब हॉटेलसमोर हा अपघात झाला. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या भीषण अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. राज्यात अपघाताच्या प्रमाणात मागील काही दिवसांपासून मोठी वाढ झालेली पहायला मिळत आहे. अकी वेगामुळे हे अपघात घडल्याचे समोर येत आहे.

नवापूर आगाराची नवापूर-नाशिक बस सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास नवापूरहून प्रवाशांना घेऊन नाशिकला जाण्यासाठी निघाली. विसरवाडी गावाच्या पुढे महामार्गावर शेरे पंजाब हॉटेल समोर आल्यावर धुळ्याहून नवापूरच्या दिशेने समोरुन येणाऱ्या ट्रकने बसला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला. या अपघातात ट्रक चालक प्रकाश यांचा मृत्यू झाला. प्रकाश हे तमिळनाडूचे रहिवाशी आहे.

अपघातात बसमधील सुमारे 10-12 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतर जखमींना स्थानिकांच्या मदतीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी रुग्णांवर या ठिकाणी प्राथमिक उपचार सुरु करण्यात आले असून गंभीर जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

या अपघातामुळे बस व ट्रकचा समोरासमोरील भाग हा चक्काचूर झाला आहे. तर बसमधील बहुतेक प्रवासी नवापूर तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. तसेच अपघात पाहण्यासाठी महामार्गावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी विसरवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी दाखल झाले.