नांदेड जिल्ह्यातील (Nanded District) इस्लापुरच्या परोटी तांडा येथे पत्नीची बेदम मारहाण करत तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. पत्नीला "तु दिसायला चांगली नाहीस, तुझ्या माहेराहून पैसे घेऊन ये" असे म्हणत आरोपी गोकुळ नामदेव चव्हाणने मयत रेश्मा गोकुळ चव्हाणला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी इस्लापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी गोकुळ आणि मयत रेश्मा यांचे 10 वर्षापुर्वी लग्न झाले होते. त्यांना दोन मुली, एक मुलगा आहे. दरम्यान सुरवातीला सर्व काही सुरळीत सुरु होते. मात्र यानंतर आरोपी गोकुळ आणि त्याची आई विमलबाई यांनी रेश्माला त्रास देण्यास सुरुवात केली. गोकुळ तू दिसायला चांगली नाहीस, तू माहेरून खर्चासाठी रुपये घेऊन ये या कारणाने सतत रेश्माला मारहाण करीत असे. दरम्यान सहा तारखेला रेश्माला केलेल्या बेदम मारहाणीत तिचा मृत्यू झाला आहे.
रेश्माचा मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर तिच्या नातेवाइकांना माहिती मिळाल्याने त्यांनी इस्लापूर पोलिस स्टेशन गाठले. गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर पोलिसांनी नवरा, सासू, दीर यांच्यावर गुन्हा दाखल केला.