
नालासोपारा (Nalasopara) मध्ये 32 वर्षीय महिलेने पतीचा खून करून त्याचा मृतदेह घरात 4 फूट खाली पुरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीचा खून महिला मित्रासोबत पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या पोलिस या दोघांच्या मागावर आहेत. मृत व्यक्ती 35 वर्षीय विजय चौहान आहे. विजय नालासोपारा मध्ये गांगदीपाडा भागात राहत होता. पत्नी चमन उर्फ गुडिया देवी आणि त्यांचा सात वर्षांचा मुलगा त्यांच्यासोबत राहत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौहान आणि त्याचा भाऊ अखिलेश यांनी नवीन घर खरेदी केले होते. नवीन घराच्या किमतीसाठी पैशांची गरज असल्याने अखिलेश गेल्या काही दिवसांपासून चौहानशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. पण, जेव्हा जेव्हा अखिलेश चौहानच्या फोनवर फोन करायचा तेव्हा तेव्हा त्याची पत्नी फोन उचलत होती. सोमवारी अखिलेश चौहानच्या घरी गेले आणि त्यांना घर बंद दिसले आणि घरातून दुर्गंधी येत होती. त्याने पोलिसांना कळवले. पोलिसांनी घर फोडले, परंतु चौहानचा कोणताही पत्ता लागला नाही. अखिलेशने पाहिले की जमिनीवरील तीन टाइल्स बाकी टाईल्सपेक्षा वेगळ्या होत्या.
घराजवळ मातीचा ढीगही दिसला. अखिलेशला संशय आला आणि त्याने पोलिसांना घरातील जमीन खोदण्याची विनंती केली, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. जेव्हा जमीन जवळजवळ चार फूट खोदली गेली तेव्हा पोलिसांना एका मानवी मृतदेहाचे अवशेष सापडले. कपड्यांवरून अखिलेशने ते चौहान यांचे असल्याचे ओळखले. खोदकाम करताना घटनास्थळी उपस्थित असलेल्या फॉरेन्सिक टीमने नमुने गोळा केले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला, असे सूत्रांनी सांगितले.
प्राथमिक पोलिस चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, चमनचे मोनू विश्वकर्मा (33) याच्याशी प्रेमसंबंध होते आणि चौहानची हत्या केल्यानंतर तो तिच्यासोबत पळून गेला होता. घरात खड्डा खोदून त्यांनी चौहानचा मृतदेह पुरल्याचा संशय आहे, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.