Nagpur Teachers Constituency Election Results 2023: देवेंद्र फडणवीस यांना दणका; भाजपच्या होमपीचवर काँग्रेसची मुसंडी, सुधाकर अडबाले विजयी
Sudhakar Adbale | (File Image)

उपमुख्यमंत्री आणि भाजपचे तगडे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना होमपीचवर दणका बसला आहे. विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघात (Nagpur Teachers Constituency Election Results 2023) काँग्रेसने (Congress) जोरदार मुसंडी मारली आहे. महाविकासआघाडी पुरस्कृत काँग्रेस उमेदवार सुधाकर अडबाले (Sudhakar Adbale) यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. सुधाकर अडबाले यांनी भाजप पुरस्कृत नागो गाणार (Nago Ganar) यांचा धक्कादायक पराभव केला आहे. नागो गाणार हे विद्यमान आमदार होते. तसेच, भारतीय जनता पक्षाची मातृभूमी समजल्या जाणाऱ्या नागपूर येथून ते रिंगणात होते. त्यामुळे गाणार यांचा विजय निश्चित मानला जात होता. परंतू, अडबाले यांच्या विजयाने सर्वांनाच धक्का दिला आहे.

काँग्रेस उमेदवार सुधाकर अडबाले यांनी तब्बल 14,061 मते मिळवत दणदणीत विजय मिळवला. त्यांच्या विरोधात असलेल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या भाजपच्या नागो गाणार यांना मात्र केवळ 6309 मतांवर समाधान मानावे लागले होते. वास्तविक पाहता नागपूर शिक्षक मतदारसंघातील स्थानिक परिस्थिती पाहता अडबाले यांचा विजय तसा फारसा कोणाच्या ध्यानीमनीही नव्हता. या मतदारसंघात भाजपचे वर्चस्व अधिक दाखवले जाते. त्यामुळे नागो गाणारच विजयी होतील असे मानले जात होते. मात्र, काँग्रेसने भाजपला होमपीचवरच धोबीपछाड दिला. (हेही वाचा, कोकण शिक्षक मतदार संघ निवडणुकीत भाजपा चे ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा दणदणीत विजय)

नागपूर येथून भाजपचे अनेक मातब्बर नेते येतात. यात महाराष्ट्र भाजपातील नेते देवेंद्र फडणवीस यांचा क्रमांक पहिला लागतो. ते स्वत: राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. सध्याही ते उपमुख्यमंत्री आहेत. शिवाय भाजपमधील राज्यातील सर्वात ताकदवान नेतृत्व म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. राज्यात महाविकासआघाडीसे सरकार खाली खेचून एकनाथ शिंदे यांच्या सोबत नवे सरकार स्थापन करण्यातही फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. शिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेसुद्धा नागपूरमधूनच येतात. परिणामी नागपूर येथून नागो गाणार यांचा विजय भाजपच्या गोटात निश्चित मानला जात होता. परंतू, भाजपला ही जागा काँग्रेसच्या आक्रमकतेसमोर राखता आली नाही.