विधानसभा निवडणुकींचे निकाल लागले खरे मात्र सत्ता स्थापनेचा प्रश्न अजूनही अधांतरी आहे. हा तिढा सुटत नसताना आता जिल्हा परिषदा (District Council Elections 2019) आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 36 पंचायत समिती निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. येत्या 7 जानेवारीला नागपूर, अकोला, वाशीम, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 36 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होणार असून 8 जानेवारी 2020 रोजी याची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.
मदान यांच्या म्हणण्यानुसार, आजपासून संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या सर्व निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2019 पासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरूवात होईल. मतदान 7 जानेवारी 2020 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पार पडेल. मतमोजणी संबंधित ठिकाणी 8 जानेवारी 2020 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.
कशी असेल जिल्हा परिषद निवडणूकीची रुपरेषा:
1. उमेदवाराने अर्ज भरण्याची तारीख: 18 ते 23 डिसेंबर 2019
2. अर्जाची पडताळणी करण्याची तारीख- 24 डिसेंबर 2019
3. अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे- 30 डिसेंबर 2019
4. अपील असल्यास उमेदवारी मागे घेणे- 1 जानेवारी 2020
5. मतदानाचा दिनांक- 7 जानेवारी 2020
6. मतमोजणीचा दिनांक- 8 जानेवारी 2020
हेदेखील वाचा- नागपूर, धुळे, नंदुरबार, अकोला व वाशीम जिल्हा परिषद निवडणूक प्रारुप मतदार याद्या 2 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार
निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात, अशी माहितीही मदान यांनी दिली.