Corona Cases in Dharavi Today: दिलासादायक! धारावीकरांनी थोपवली ​कोरोनाची दुसरी लाट, गेल्या 24 तासात एकाही कोरोनाबाधितांची नोंद नाही
Dharavi (Photo Credits: Wikimedia Commons)

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या धारावीने (Dharavi) स्वंयशिस्त आणि सामुहिक प्रयत्नातून कोरोनावर नियंत्रण ठेवता येते हे जगाला दाखवून दिले आहे. धारावीत गेल्या 24 तासात एकाही कोरोनाबाधित रुग्णांची (Coronavirus) नोंद झाली नसल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 8 एप्रिल रोजी धारावी येथे एकाच दिवसात सर्वाधिक 99 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. ज्यामुळे वैद्यकीय प्रशासनासमोर अनेक प्रश्न उभे राहिले होते. मात्र, धारावीकरांनी प्रशासनाला सहकार्य करत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवले आहे. ज्यामुळे धारावी मॉडेलचे जगभरातून कौतूक होत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत धारावीकर, मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि स्वंयसेवी संस्थांचा सहभाग या तिघांच्या एकात्मिक प्रयत्नांचे फलित म्हणून धारावीतील कोरोना साथीच्या नियंत्रणाच्या यशाकडे पहावे लागेल. कोरोना साथीला नियंत्रित करण्यासाठी स्थानिक लोकांचा सहभाग मिळवणे, चाचण्या करणे, रुग्णांचा शोध घेणे, त्यांचे अलगीकरण करून रुग्णांवर योग्य उपचार करणे, शारीरिक अंतराच्या नियमाचे, स्वच्छतेचे आणि स्वंयशिस्तीचे काटेकोरपणे पालन करणे याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिल्याने कोरोनाची साखळी तोडता येते, हेच धारावीमध्ये दिसून आले आहे. हे देखील वाचा- Coronavirus in Mumbai: मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 700 रुग्णांची व 19 मृत्यूंची नोंद

ट्वीट-

धारावीतील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 हजार 844 पर्यंत पोहोचली आहे. तर, 6 हजार 465 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. धारावीत सध्या एकूण 20 रुग्ण सक्रीय आहेत. जी / उत्तर वॉर्डमधील करोनाबाधित रुग्णांची आकडेवारी मुंबई पालिकेने जाहीर केली आहे. या वॉर्डमध्ये येणाऱ्या दादरमध्ये 3 आणि माहिममध्ये 6 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. महत्वाचे म्हणजे, मुंबईत गेल्या वर्षी सर्वात पहिला कोरोनाचा रुग्ण 1 एप्रिल रोजी मुंबईत आढळून आला होता. ज्यानंतर वैद्यकीय प्रशासन चिंतेत पडले होते. कारण, धारावीतील चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये झोपड्या एकमेकांना खेटून आहेत. एवढेच नव्हेतर, एका झोपडीत आठ ते दहा लोक राहतात. यामुळे कोरोनाचा संसर्ग झपट्याने वाढण्याची शक्यता होती. मात्र, मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी खचून न जाता मोठी मेहनत घेतली, ज्याचे चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहेत.