Water Cut | Image Used For representational Purpose | Pixabay.com

मुंबईच्या (Mumbai) भायखळा आणि नागपाडा सारख्या 'ई' प्रभागात पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी, बीएमसीने नवीन प्रकल्प सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून, 28 मे रोजी सकाळी 10 ते 29 मे रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत काही कामे केली जाणार आहेत. या 24 तासांच्या कालावधीत, कुलाबा, फोर्ट, मोहम्मद अली रोड, डोंगरी, भायखळा आणि नागपाडा येथील काही भागात पाणीपुरवठा होणार नाही (Water Cut). या उपक्रमाचा एक भाग म्हणून, नवनगर आणि डॉकयार्ड रोडवरील जुनी 1200 मिमी व्यासाची पाणीपुरवठा पाइपलाइन बंद केली जाईल आणि त्याऐवजी नवीन 1200  मिमी व्यासाची पाइपलाइन टाकली जाणार आहे.

याव्यतिरिक्त, भंडारवाडा जलाशयाच्या कंपार्टमेंट 1 वरील जुनी 900 मिमी व्यासाची व्हॉल्व्ह काढून टाकली जाईल आणि त्याऐवजी नवीन 900 मिमी व्यासाची व्हॉल्व्ह बसवली जाईल. बाधित भागातील रहिवाशांना विनंती आहे की, त्यांनी नियोजित पाणी कपातीपूर्वी त्यांच्या गरजांसाठी पुरेसे पाणी आगाऊ साठवून ठेवावे. बंद कालावधीत, पाण्याचा वापर काटकसरीने करावा. पाईपलाईनच्या कामानंतर, बाधित भागात पुढील दोन दिवस कमी दाबाने आणि गढूळ पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. खबरदारी म्हणून, नागरिकांना वापरण्यापूर्वी पाणी फिल्टर करून उकळून घ्यावे आणि या काळात बीएमसीला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. (हेही वाचा: Waterlogging On Metro Line 3: मुंबईतील पावसामुळे मेट्रो लाईन 3 वरील आचार्य अत्रे चौक स्थानकात साचले पाणी; MMRC ने जारी केले स्पष्टीकरण)

प्रभावित परिसर-

सेंट जॉर्ज हॉस्पिटल, पी. डी’मेलो रोड, रामगड झोपडपट्टी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय), नेव्हल डॉकयार्ड, शहीद भगतसिंग रोड, मुख्य पोस्ट ऑफिस (जीपीओ), जंक्शनपासून ते रिगल सिनेमापर्यंत, मोहम्मद अली रोड, इमाम वाडा मार्ग, इब्राहिम मर्चंट मार्ग, युसूफ मेहेर अली मार्ग, नाकोडा, नूरबाग, डोंगरी, रामचंद्र भट मार्ग, सॅम्युअल स्ट्रीट, केशवजी नाईक मार्ग, मस्जिद बंदर, उमरखाडी, वालपाखडी. मुंबई पोर्ट ट्रस्ट क्षेत्र, नागपाडा, आग्रीपाडा, काळाचौकी, चिंचपोकळी, माझगाव कोळीवाडा इ.