Waterlogging On Metro Line 3

महाराष्ट्रात सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस (Heavy Rains) सुरु आहे. पावसामुळे राजधानी मुंबई (Mumbai) अक्षरशः जलमय झाली आहे. अशात मुंबईच्या पहिल्या पूर्णपणे भुयारी मेट्रो मार्ग असलेल्या मेट्रो लाईन 3 (कुलाबा-बांद्रा-सीप्झ) वर 26 मे 2025 रोजी पावसामुळे मोठी अडचण निर्माण झाली. नव्याने सुरू झालेल्या आचार्य अत्रे चौक स्थानकात मुसळधार पावसामुळे पाणी शिरले, ज्यामुळे या मार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करावी लागली. हा मार्ग 9 मे 2025 रोजी बांद्रा-कुर्ला संकुल (BKC) ते आचार्य अत्रे चौक (वांद्रे नाका) या टप्प्यासाठी खुला झाला होता, आणि अवघ्या 17 दिवसांतच पावसाने त्याच्या बांधकाम गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

या घटनेमुळे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) आणि प्रशासनावर टीका होत असून, पायाभूत सुविधांच्या मान्सून तयारीबाबत चर्चा सुरू झाली आहे. 26 मे 2025 रोजी पहाटेपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे, ज्यामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले. भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला होता. या पावसामुळे आचार्य अत्रे चौक स्थानकात, विशेषतः डॉ. अ‍ॅनी बेझंट रस्त्यावरील बांधकामाधीन प्रवेश/निर्गम संरचनेतून पाणी शिरले.

प्रवाशांनी सांगितले की, स्थानकातील जिने आणि कॉनकोर्स क्षेत्र पाण्याने भरले, ज्यामुळे ते तलावासारखे दिसत होते. काही प्रवाशांनी पाणी मेट्रो गाड्यांपर्यंतही पोहोचल्याचे नमूद केले, तर एस्केलेटर्स पाण्याखाली गेल्याने ते बंद पडले. परिणामी, आचार्य अत्रे चौक स्थानक पूर्णपणे बंद करण्यात आले, आणि वरळी ते आचार्य अत्रे चौक दरम्यान मेट्रो सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली. मात्र, आरे जेव्हीएलआर ते वरळी दरम्यानच्या सेवा सुरळीत सुरू आहेत. वांद्रे मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी स्थानकाला भेट देऊन या घटनेचा तीव्र निषेध केला.

यानंतर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने तातडीने निवेदन जारी करत याबाबत स्पष्टीकरण दिले. एमएमआरसीने म्हटले आहे, ‘मुंबईत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे डॉ. अ‍ॅनी बेझंट रोडलगत असलेल्या आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकाच्या बांधकामाधीन प्रवेश/निकास मार्गावर पाणी शिरले. ही घटना सांडपाणी निःसारण नाल्यातून अचानक आलेल्या पाण्यामुळे वॉटर-रिटेनिंग वॉल कोसळल्याने घडलेली आहे. ही भिंत प्रवेश/निर्गम संरचना सुरक्षित ठेवण्यासाठी उभारण्यात आली होती.’

Waterlogging On Metro Line 3:

‘यासंदर्भात एमएमआरसी स्पष्ट करु इच्छिते की, पाणी शिरलेला प्रवेश/निर्गम मार्ग सध्या बांधकामाधीन असून प्रवाशांसाठी खुला झालेला नाही. खबरदारीचा उपाय म्हणून आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने, वरळी ते आचार्य अत्रे चौक दरम्यान मेट्रो सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. मात्र आरे जेव्हिएलआर ते वरळी दरम्यान मेट्रो सेवा सुरळीत सुरू आहे. आपत्ती व्यवस्थापन, अभियांत्रिकी व सुरक्षा पथकाने घटनास्थळी तात्काळ कार्यवाही सुरू केली असून, बाधित भागाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. प्रवाशांची सुरक्षितता आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्याची असून, सर्व प्रणाली पूर्णपणे कार्यक्षम झाल्यानंतरच सेवा पूर्ववत सुरू करण्यात येईल.’ (हेही वाचा: Mumbai Metro Flooding: नव्याने उद्घाटन झालेलं वरळी मेट्रो स्थानक पहिल्याच पावसात जलमय; Aqua Line मार्गावरील सेवा अर्धवट बंद)

Waterlogging On Metro Line 3:

दरम्यान, मुंबई मेट्रो लाईन 3 ही शहरातील पहिली पूर्णपणे भुयारी मेट्रो आहे, जी 33 किमी लांबीच्या कुलाबा-बांद्रा-सीप्झ मार्गाचा भाग आहे. या मार्गाचा दुसरा टप्पा, बीकेसी ते आचार्य अत्रे चौक, 9 मे 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाला होता. या मार्गावर धारावी, शीतलादेवी मंदिर, दादर, सिद्धिविनायक मंदिर आणि वरळी यासारखी प्रमुख स्थानके आहेत. मुंबईत दरवर्षी मान्सूनमध्ये पाणी साचण्याच्या समस्या उद्भवतात, आणि यंदा मान्सून 8 दिवस लवकर दाखल झाल्याने ही समस्या अधिक तीव्र झाली.