Image For Representation (Photo Credits-ANI)

लॉक डाऊन (Lock Down) काळात जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशावेळी तळीराम मंडळींची मात्र चांगलीच पंचाईत झाली आहे. दारूची तहान करण्यासाठी ही मंडळी आता थेट चोरीमारीच्या मार्गाकडे वळत आहेत, वडाळा (Wadala) येथील पुनीत वाईन शॉप मध्ये अशाच काही दारूवेड्यांनी काल मध्यरात्रीच्या सुमारास दुकानाचे शटर तोडून आतमधील 182 दारूच्या बाटल्या पळवल्याचे समजत आहे, याशिवाय दुकानातील 35 हजार रुपये सुद्धा या भुरट्या चोरांनी लंपास केले आहेत. तर दुसरीकडे मालाड (Malad) येथील मालवणी (Malwani)  या भागात एका गावठी दारू विक्री करणाऱ्या गुत्त्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.(हेही वाचा - वाईन, लिकरसाठी ऑनलाइन पेमेंट स्वीकारले जाईल: या सोशल मीडियावरील फसव्या जाहिरातींना बळी पडू नका; पोलिसांचे नागरिकांना आवाहन)

प्राप्त माहितीनुसार, वडाळा पश्चिम येथील पुनीत वाइन शॉपमधून 182  दारूच्या बाटल्या आणि 35 हजार रुपये चोरल्याप्रकरणी अज्ञातांवर आर.ए.के. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मालाड येथे मढ मार्केट येथे पुष्पा पुजारी  ही 42 वर्षीय महिला गावठी दारू विकत असल्याची खबर मिळताच मालवणी पोलिसांनी कारवाई करत,70 लीटर गावठी दारू जप्त केली आहे.

दरम्यान, आतापर्यंत राज्यात अवैध मद्य विक्री प्रकरणी 2 हजार 383 प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 937 जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय 115 वाहने आणि 5 कोटी 71 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.