
मुंबई ट्राफिक पोलिसांकडून (Mumbai Traffic Police) 23 सप्टेंबर साठी एक ट्राफिक नियमावली (Mumbai Traffic Advisory) जारी केली आहे. यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या भूमीपुजनाच्या कार्यक्रमाचं औचित्य साधत ही नियमावली जारी करण्यात आली आहे. 23 सप्टेंबरच्या या कार्यक्रमासाठी सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्यासोबतच अनेक व्हीव्हीआयपी देखील हजर राहणार असल्याने वांद्रे पूर्व परिसरामध्ये वाहतूकीमध्ये बदल होणार आहेत. हा सोहळा वांद्रे पूर्व येथील गर्व्हमेंट कॉलनी ग्राऊंड, खेरवाडी इथे संपन्न होणार आहे
Deputy Commissioner of Police समाधान पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक सुरळीत राहावी आणि सामान्यांना त्रास कमी व्हावा यासाठी बीकेसी भागात वाहतूकीचे मार्ग बदलण्यात येतील.
कोणते मार्ग सामान्यांना वाहतूकीसाठी बंद राहतील?
23 सप्टेंबर दिवशी दुपारी 2 ते रात्री 9 दरम्यान वाहतूकीच्या मार्गामध्ये बदल होणार आहेत. न्यू इंग्लिश स्कूल रोड पर्यंत वाहतूक मर्यादित राहील. तर रामकृष्ण परमहंस मार्ग आणि जे एल शिर्सेकर मार्ग यांना जोडणारा मार्गावरील वाहतूक देखील प्रभावित होणार आहे. या मार्गावरून केवळ कार्यक्रमाच्या ठिकाणी जाणार्या गाड्यांना प्रवेश असणार आहे.
पर्यायी मार्ग कोणते असणार?
वाहतूक विभागाच्या माहितीनुसार, प्रवाशांना महात्मा गांधी विद्या मंदिर रोड हा पर्यायी मार्ग वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार, मुंबईत 23 सप्टेंबर रोजी हलक्या पावसासह ढगाळ आकाश राहील असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे पावसाचा वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो आणि सोमवारी गर्दी होऊ शकते. विलंब टाळण्यासाठी प्रवाशांनी हवामानाची परिस्थिती आणि वाहतूक सल्ला लक्षात घेऊन त्यांच्या प्रवासाचे नियोजन केले पाहिजे. सोमवारी मुंबई मध्ये कमाल तापमान 38 अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिरावण्याचा अंदाज आहे तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.