युट्युब (YouTube) हे जगातील सर्वात लोकप्रिय व्हिडीओ स्ट्रीमिंग व्यासपीठांपैकी एक आहे. या ठिकाणी स्वयंपाकापासून ते स्टंट, संगीत, चित्रपट, माहिती असे विविध प्रकारचे व्हिडीओ पहायला मिळतात. हे व्हिडीओ योग्य कारणासाठी वापरल्यास ते उपयुक्त ठरू शकतील. मात्र कधी कधी गुन्ह्यासाठीदेखील अशा व्हिडीओंचा वापर होतो. एटीएममधून फसवणूक करून पैसे काढणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी गुरुवारी अटक केली. पोलिसांनी 17 लाख रुपयांच्या मुद्देमालासह त्याला ताब्यात घेतले.
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, या गुन्हेगाराने सुरुवातीला बँकेत एटीएमची पिन आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांक कसा बदलायचा याचे व्हिडिओ यूट्यूबवर पाहिले. त्यानंतर, त्याने फसवणूक करून त्याच्या मालकिणीच्या बँक खात्याचे एक्सेस डिटेल्स कसे बदलायचे याचे व्हिडीओ पाहिले. त्यानंतर त्याने एटीएमद्वारे मालकिणीच्या खात्यातून 17 लाख रुपये लंपास केले. परंतु अखेरीस त्याला पकडण्यात यश आले.
नीलेश पटारी असे या व्यक्तीचे नाव असून तो मुंबईतील महावीर नगर, कांदिवली पश्चिम येथे घरकामगार म्हणून कामाला होता. अहवालात कांदिवली पोलीस स्टेशनच्या अधिकार्यांचा हवाला देऊन म्हटले आहे की, पटारी नोकरीच्या शोधात जानेवारीत मुंबईत आला. त्यावेळी एका वृद्ध महिलेने त्याला महावीर नगरमध्ये घरगुती नोकर म्हणून कामावर ठेवले. ही महिला घरी एकटीच राहत होती.
निलेशने प्रथम तिचे एटीएम कार्ड कपाटातून शोधून काढले. यूट्यूबवर, त्याने पिन आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांक बदलण्याची प्रक्रिया जाणून घेतली व संधी मिळताच खात्यातून 17 लाख रुपये घेऊन पोबारा केला. महिलेच्या मुलीने बँक खाते तपासले असता ते रिकामे असल्याचे तिला आढळले आणि तिने लगेचच चोरीची तक्रार केली. (हेही वाचा: Kalyan: एक्सप्रेस ट्रेनमधून 55 किलो गांजा घेऊन जाणाऱ्या 3 जणांना कल्याण GRP कडून अटक)
पोलिसांनी बँक खाते तपासले असता ते रिकामे दिसले. त्यानंतर लगेचच टीमने हालचाल सुरु केली. गुरुवारी, पोलिसांनी त्याचा मुंबईतील दहिसर परिसरात शोध घेतला, जिथे तो एटीएममधून पैसे काढत होता. त्याला जागीच अटक करण्यात आली. ‘पटारीने लुटलेले पैसे खर्च केले नव्हते. त्याच्याकडून संपूर्ण रक्कम वसूल केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याने सांगितले की त्या पैशातून त्याला फूड स्टॉल सुरु करायचा होता.