Representational Image (Photo Credits: Facebook)

काही दिवसांपूर्वी मुंबईतील (Mumbai) लोकमान्य टिळक टर्मिनल्समध्ये Lokmanya Tilak Terminus) कारशेड येथे उभ्या असलेल्या शालिमार एक्स्प्रेसमध्ये जिलेटीनच्या कांड्या, स्फोटकं आणि निनावी पत्रं सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र आता या प्रकरणाचा छडा लागला आहे. या प्रकरणी टिळक नगर पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असून आनंद वानखेडे असे या तरुणाचे नाव आहे. प्रेमसंबंधातून त्याने हे कृत्य केले. आपल्या प्रेयसीच्या पतीला फसवण्यासाठी त्याने हा बनाव रचला असल्याची माहिती समोर आली आहे. (मुंबई: लोकमान्य टिळक टर्मिनस येथील शालिमार एक्स्प्रेस मध्ये जिलेटीनच्या कांड्या सापडल्याने खळबळ)

आनंद वानखेडे या आरोपीला अकोल्यातून अटक करण्यात आली असून आज त्याला मुंबईत आणण्यात येईल. आनंदचे एका विवाहीत महिलेसोबत प्रेमसंबंध होते. तिच्या पतीला पोलिसांच्या जाळ्यात अडकवण्यासाठी त्याने हा बनाव रचल्याचे कबूल केले आहे.

5 जून रोजी रमजान ईदच्या दिवशी मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथील शालिमार एक्स्प्रेसच्या डब्यात जिलेटीनच्या पाच कांड्यांसह, स्फोटकं आणि निनावी पत्र सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. यामुळे लोकमान्य टिळक टर्मिनसमधील वाहतूक काही काळ खोळंबली होती. या प्रकरणी पोलिसांत धाव घेत बॉम्ब शोधक पथकालाही पाचारण करण्यात आले होते. तसंच मुंबईत घातपाताचा कट तर नाही अशी भीती व्यक्त होत होती. मात्र या प्रकरणाने वेगळचे वळण घेतले आहे.