Dead Body | Representational Image (Photo Credits: Pixabay)

दक्षिण मुंबई (South Mumbai) मध्ये कफ़ परेड परिसरात एका चालकाने बेदारकपणे कार चालवल्याने एकाचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले आहे. 36 वर्षीय प्रसेनजीत गौतम धाडसे यांचा या अपघातामध्ये नाहक बळी गेला आहे. धाडसे हे नवी मुंबई पोलिस आयुक्तालयात लिपिक होते. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे असिस्टंट जनरल मॅनेजर (एजीएम) नितेश कुमार मंडल (वय 43 वर्षे) आणि एसबीआय कॅपिटलचे सहाय्यक उपाध्यक्ष सुजय कुमार विश्वास (वय 35 वर्षे) जखमी आहेत.

काल (12 एप्रिल) दिवशी दुपारी 2 च्या सुमारास 28 वर्षीय मुकेश प्रदीप सिंह याने आपल्या मालकाला नरिमन पॉंईंटच्या मेकर चेंबर मध्ये सोडलं आणि नंतर नातेवाईकांना भेटण्यासाठी तो जात होता. तेव्हा वर्ल्ड ट्रेड सेंटर जवळ गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरील 3 जणांना उडवले. नंतर त्याची गाडी एका टॅक्सीला आदळली. या धडकेत रस्त्यावर थांबलेली टॅक्सी धाडसे यांना धडकली आणि ते एका सिमेंट ब्लॉक वर आपटले. यामध्ये त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली, रक्तस्त्राव झाला. त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत पोलिसाची बॉडी पुढे जे जे रूग्णालयात पाठवण्यात आली. हे देखील नक्की वाचा: Mumbai Hit And Run Case: फ्लायओव्हर वर कारने अचानक घेतलेल्या यू टर्न ने दोन बाईकस्वारांचा घेतला जीव .

मुकेश सिंह ला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तो दारूच्या नशेत होता का? यासाठी रक्ताचे नमुने गोळा करण्यात आले आहे.