मुंबईत जर आपण उद्या लोकल ट्रेनने (Mumbai Local) प्रवास करण्याचा बेत आखत असाल तर प्रवासासाठी बाहेर पडण्यापुर्वी रेल्वेच्या मेगाब्लॉकचे अपडेट (Megablock) वाचूनच बाहेर पडावे. उद्या म्हणजेच रविवारी (6 ऑगस्ट) लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे करण्यासाठी मेगाब्लॉक हा घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे लोकल विलंबाने धावणार आहेत. तसेच काही एक्सप्रेस ट्रेनच्या वेळापत्रकावर देखील त्याचा परिणाम पहायला मिळेल. (हेही वाचा - Mumbai-Pune Expressway: मुंबई ते पुणे प्रवास आता आणखी वेगवान होणार; एमएसआरडीसीने घेतला मोठा निर्णय)
मध्य रेल्वेच्या माटुंगा ते ठाणे अप -डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 8.30 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. या ब्लॉकदरम्यान CSMT येथून सुटणाऱ्या डाऊन मार्गावरील धीम्या लोकल डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि ठाणे स्थानकांवर थांबतील. त्यानंतर ठाणे स्थानकानंतर पुन्हा धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. त्याचबरोबर कल्याणहून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या ठाणे स्थानकावर अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.
हार्बर रेल्वे मार्गावरील कुर्ला-वाशी अप आणि डाउन मार्गावर रविवारी सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत पनवेल येथून सुटणाऱ्या सीएसएमटी मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून वाशी/ पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावरील मरिन लाइन्स -माहीम अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. कालावधीत मरिन लाइन्स आणि माहीम रेल्वे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील सर्व सेवा जलद मार्गावर चालवल्या जातील.