Mumbai Pune Expressway Traffic | (Photo Credit - Twitter)

महाराष्ट्राची राजधानी मुंबईला पुण्यासोबत  (Mumbai - Pune) जोडण्यासाठी 2002 मध्ये 94 किलोमीटरचा द्रुतगती मार्ग तयार करण्यात आला. ज्या वेळी हा मार्ग बांधण्यात आला, त्यावेळी वाहनांची संख्या कमी होती. आता मात्र त्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. यामुळे अनेकदा मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर (Mumbai-Pune Expressway) वाहतुक कोंडी देखील पहायला मिळते. महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी बघता, दोन्ही बाजूंच्या प्रत्येकी एक लेन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता मुंबई ते पुणे प्रवास आता आणखी वेगवान होणार आहे.  (हेही वाचा - Manipur Violence: मणिपूरात हिंसाचार सुरुच, विष्णूपुरात 3 जणांचा मृत्यू, अनेक घरेही जाळली)

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रस्ताव तयार केला असून तो अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच एक्सप्रेस वेवर दोन्ही बाजून अतिरिक्त लेन बांधण्यास सुरूवात होईल. या दोन नवीन लेनच्या कामासाठी सुमारे 5 हजार कोटींचा खर्च होणार असल्याचा अंदाज हा व्यक्त केला जात आहे.  पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून रोज सुमारे 60 ते 70 हजार वाहनांची वाहतूक होते. शनिवारी व रविवारी या संख्येत वाढ होऊन ती 90 हजार ते एक लाखाच्या घरात जाते.

एक्सप्रेस वेवर दोन नवीन लेन तयार झाल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होईल, शिवाय प्रवासदेखील वेगवान होणार आहे. सध्या या मार्गावर सहा लेन आहेत. यातील तीन लेन मुंबईच्या दिशेने, तर तीन पुण्याच्या दिशेने आहेत. या दोन लेन वाढवण्यासाठी काही गावांतील जागांचे संपादन देखील करावे लागणार आहे.