Mumbai pune home sales decline 9 nine cities (Photo Credit- file photo)

मुंबई, (Mumbai) पुणे (Pune) तसेच इतर 9 शहरांमध्ये  या वर्षीच्या जुलै ते सप्टेंबर या काळात घरांच्या विक्रीत 25 टक्क्यांची घट झाली आहे. ग्राहकांच्या थंड प्रतिसादमुळे नव्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये (Home Construction Project) 45 टक्क्यांची कपात झाली आहे. असे निरीक्षण ‘प्रॉपटायगर डॉट कॉम’ (Proptiger.com) या संस्थेच्या सर्वेक्षणात नोंदवण्यात आले आहे. प्रॉपटायगरच्या अहवालानुसार, या काळावधीत देशातील 9 महत्त्वाच्या शहरांमध्ये फक्त 65,799 घरांची विक्री झाली आहे.

हेही वाचा - सणासुदीला घर घेतायत? तर लक्षात राहू द्या 'या' गोष्टी

घरबांधणीच्या कामांमध्येही घट -

जुलै ते सप्टेंबरपर्यंत 7 महत्त्वाच्या शहरांमध्ये घरांची विक्री घटल्याचा निष्कर्ष ‘अ‍ॅनारॉक’ व ‘जेएलएल’ या संस्थांनीही काढला होता. अ‍ॅनारॉकने वर्तवलेल्या निष्कर्षाच्या मते घरविक्रीत 18 टक्के तर जेएलएलच्या मते 1 टक्का घट झाली होती. तसेच ‘रिअल इनसाइट’ या स्थावर मालमत्तेबाबतच्या संस्थेने म्हटले आहे की, 9 शहरांमध्ये गेल्या वर्षी जुलै ते सप्टेंबर या 3 महिन्यांत 88,078 घरांची विक्री झाली होती. मात्र यंदा या काळावधीत मोठी घट झाली आहे. गेल्या वर्षी जुलै ते सप्टेंबर या काळात 61,679 घरबांधणीची नवी कामे सुरू झाली होती. मात्र यंदा फक्त 33,883 नवी घरे बांधण्याच्या कामांना प्रारंभ झाला आहे.

हेही वाचा - जाणून घ्या म्हाडाची घरे मिळवण्याची नक्की काय आहे प्रक्रिया, कोण होऊ शकते या लॉटरीमध्ये सहभागी

प्रॉपटायगरने केली विविध शहरांतील गृहप्रकल्पांची पाहणी -

प्रॉपटायगरने मुंबई, नवी मुंबई, ठाणे यासह मुंबई महानगर प्रदेश, पुणे, नॉयडा, गुरगाव, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, अहमदाबाद या शहरांमधील घरांच्या विक्री व नव्या गृहनिर्माण प्रकल्पांसंदर्भात पाहणी केली होती. या पाहणीत ही घट दिसून आली.

गृहप्रकल्पांना आर्थिक मंदीचा फटका -

सध्या देशात आर्थिक मंदीसदृश्य वातावरण आहे. त्यामुळे बिल्डरांना स्थावर मालमत्तेच्या कामांसाठी होणारा पतपुरवठा आटला आहे. तसेच ग्राहकांनीही नवी घरे घेण्याचा विचार पुढे ढकलला आहे. त्यामुळे घरांच्या विक्रीवर परिणाम होत आहे. पुढील 3 महिन्यांमध्ये नवे गृहनिर्माण प्रकल्प सुरू होण्याचे प्रमाण कमीच असणार आहे, असा अंदाजही प्रॉपटायगरसह काही संस्थांनी वर्तविला आहे.