शहीद जवानांसाठी प्रार्थना करताना मुस्लीम बांधव | (Photo Credtis Social Media)

Pulwama Terror Attack: मुंबई येथील मुस्लीम बांधवांनी एकजूटीचे दर्शन घडवत पुलवामा(Pulwama) दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ (CRPF) जवानांसाठी प्रार्थना केली. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या मुस्लीम बांधवांनी या वेळी दहशतवाद आणि पाकिस्तानच्या दहशतवादी वृत्तीचा कडाडून विरोध केला. सरकार आणि लष्कराने या हल्ल्याचा अधिक कठोरपणे बदला घ्यावा अशी मागणीही यावेळी एकमुखाने करण्यात आली. मोजदृदत वेलफेयर असोसिएशन या मुस्लीम संघटनेकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मुंबईतील सांताक्रूज येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास सुमारे 20 हजार मुस्लीम बांधव उपस्थित होते. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत शहीदांसाठी या वेळी प्रार्थना करण्यात आली. या कार्यक्रमावेळी भारतातील धर्मनिरपेक्षता आणि विविधतेत एकता या वैशिष्ट्याचेही दर्शन घडले. कार्यक्रमापूर्वी आणि कार्यक्रमानंतर कार्यक्रमस्थळाची स्वच्छात करण्यात आली. ही जबाबदारी स्थानिक नगरसेवक राजू भुटकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. (हेही वाचा,ज्या युद्धात राजाच्या जीवाला धोका नसतो त्याला राजकारण म्हणतात; नवज्योत सिंग सिद्धू यांचे ट्विट )

सुट्टी संपवून कर्तव्यावर निघालेल्या जवानांच्या ताफ्यावर जम्मू आणि काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात चौदा फेब्रुवारी या दिवशी दहशतवादी हल्ला झाला. या ताफ्यातील 70 वाहनांतून तब्बल २,५४७ जवान कर्तव्यावर निघाले होते. दरम्यान, हल्लेखोराने तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकची धडक जवानांच्या ताफ्यातील वाहनाला दिली. यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) ४2 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरातून संतापाची भावना निर्माण झाली आहे. या संतापातून जात, धर्माच्या पलीकडे जाऊन हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी नागरिक मोठ्या प्रमाणावर करत आहेत.