Coronavirus: मास्क है ना!; मुंबई पोलिसांनी शेअर केला शाहरुख खान याच्या 'मैं हू ना' चित्रपटातील खास व्हिडिओ
Main Hoon Na | (Photo Credits: Twitter)

अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) याच्या 'मै हू ना' (Main Hoon Na) या चित्रपटातील एका खास दृश्याचा एक व्हिडिओ मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. या व्हिडिओसोबत 'मास्क है ना! यापुढे असे स्टंट्स करण्याची आवश्यकता नाही' असा खास संदेश देत कोरोना व्हायरस बाबत एक संदेशही दिला आहे. कोरना व्हायरस संकटसमयी राज्यभर लावण्यात आलेला लॉकडाऊन (Lockdown) यशस्वी करणे. कायदा व सुव्यवस्था याची अंमलबजावणी करणे याची सर्वाधिक जबाबदारी मुंबई पोलिसांवर आहे. त्यामुळे मुंबई पोलिस विविध माध्यमांतून कोरोना व्हायरसबाबत जनजागृती करत आहेत.

कोरोना व्हायरस रुग्णांची एकूण आकडेवारी पाहता महाराष्ट्र देशात क्रमांक एकवर आहे. त्यातही महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस रुग्णांची एकूण संख्या पाहता मुंबई शहरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. गर्दीने गजबजलेली ठिकाणे, दाटीवाटीने राहणारी लोकवस्ती, झोपडपट्टी, नागरिकांची जीवनशैली, आर्थिक स्तर अशा विविध कारणांमुळे मुंबईत कोरोना व्हायरस लागण होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यातही मुंबई हे शहर देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यवहार, जगभरातील नागरिक, पर्यटक आणि हवाई वाहतूक यामुळे मुंबई शहराचा जगभरातील इतर देशांशी दैनंदिन संपर्क आहे. अर्थात सद्यास्थितीत भारताच्या हवाई सीमा सील असल्यामुळे हा व्यवहार सध्या बंद आहे. मात्र, सुरुवातीच्या काळात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर मुंबईत आले. (हेही वाचा, Coronavirus: तुमच्या जिल्ह्यात कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्या किती? महाराष्ट्राचा एकूण आकडा किती?)

मुंबई पोलीस ट्विट

महाराष्ट्रात सद्यास्थितीत COVID19 बाधित रुग्णांची संख्या 1761 इतकी आहे. त्यातील 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शेवटच्या अपडेटनुसार गेल्या 24 तासात कोरोना व्हायरसचे 187 नवे रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रासोबतच देशभरातील कोरोना व्हायरस बाधित रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.