New Year 2020: मद्यपान करुन वाहन चालवणाऱ्या 778 वाहनचालकांवर गुन्हा दाखल; मुंबई पोलिसांची कारवाई
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

थर्टीफर्स्टच्या (New Year Party) रात्री मद्यपान (Drunk & Driving) करून वाहन चालवणाऱ्या 778 वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांचे चालक परवाने निलंबित करण्याची मागणी वाहतूक पोलिसांमार्फत न्यायालयाकडे केली जाणार आहे. त्यामुळे या चालकांना थर्टीफर्स्टची नशा चांगलीच भोवणार आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना मद्यपान करून वाहन चालवू नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येते; परंतु अनेकजण पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्याने मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याने अपघाताच्या घटना घडतात. त्यामुळे थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हच्या कारवाई केल्या जातात.

नव्या वर्ष साजरा करण्यासाठी बहुतांश लोक मोठ्या प्रमाणात मद्यपानाचा समावेश करतात. यातच मुंबई पोलिसांनी 31 डिसेंबर 2019 च्या रात्री मद्यपान करुन वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई केली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी एका दिवसात 778 वाहन चालकांवर गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांकडून दरवर्षी अनेक वाहन चालकांवर कारवाई केली जात आहे, तरीदेखील मद्यपान करणाऱ्या संख्येत वाढ झाल्याची दिसत आहे. सुरक्षित वाहतूक हा सर्वांच्याच दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा आहे. शहर-जिल्ह्यात वाहतूक शिस्तीसाठी ट्रॅफिक ड्राईव्ह सुरू केला आहे. यातून बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई केली जाईल. मद्यपींसह वाहन चालविणारी अल्पवयीन मुले आणि त्यांच्या पालकांवरही कारवाई सुरू राहील, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. हे देखील वाचा- मुंबई: नववर्षाच्या स्वागतासाठी वांद्रे येथील महत्त्वाच्या मार्गांवर करण्यात आली विशेष वाहतूक व्यवस्था; पार्किंगसाठी खास उपाययोजना

एएनआयचे ट्वीट-

सार्वजनिक ठिकाणी वाहन चालविताना रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण 30 मि.ग्रॅ. किंवा त्यापेक्षा जास्त असल्यासच मद्यपीवर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, असा नियम दोन वर्षापूर्वी होता. मात्र, मद्यपान करून वाहन चालविण्याचे आणि त्यामुळे निष्पाप लोकांचा विनाकारण मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. मद्यपान करुन होणाऱ्या अपघाताला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत.