ऑक्टोबर 2018 मध्ये एका 21 वर्षीय तरुणाने एका अल्पवयीन मुलीच्या गालाचा चावा घेतला होता. याप्रकरणी कोर्टाने निकाल दिला असून त्या आरोपीला 11 महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच 1000 रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. मटा ने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला गुन्हा घडल्यानंतर ताबडतोब अटक करण्यात आली होती. त्यानंतर हा तरुण तुरुंगातच होता. दरम्यान, कोर्टानं मार्च 2018 मध्ये अन्य एका प्रकरणात आरोपीची निर्दोष सुटका केली होती. 2015 मध्ये याच पीडित मुलीचे अपहरण, बलात्कार आणि जबरदस्ती लग्न केल्याचा आरोप त्याच्यावर होता.
18 ऑक्टोबर 2018 ही घटना आहे. त्यावेळी पीडित मुलगी घरात एकटीच होती. तिचे कुटूंबीय काही सोहळ्याकरिता बाहेर गेले होते. त्यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी तिच्या खोलीत शिरला आणि तिला घट्ट पकडून तिच्या उजव्या गालाचा चावा घेतला. त्यानंतर तिने बराच आरडाओरडा केला. पण आरोपीने तिला सोडलं नाही. बराच वेळ प्रतिकार केल्यानंतर पीडितेने त्याच्या तावडीतून सुटका केली आणि आरोपीनेही तिथून पळ काढला होता. हेही वाचा- कल्याण: दुसरीत शिकणा-या अल्पवयीन मुलीवर सलग 8 महिने सामूहिक बलात्कार, आरोपींमध्ये 2 दुकानमालक आणि एका केटररचा समावेश
या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी आरोपीला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो तुरुंगातच होता. या प्रकरणी कोर्टानं नुकताच निकाल दिला. बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार, आरोपीला अकरा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
या प्रकरणी कोर्टात विशेष सरकारी वकील गीता शर्मा यांनी ठोस पुरावे सादर केले. सुनावणीदरम्यान वकिलांनी विस्तृत अहवालही सादर केला होता. तत्पूर्वी पीडितेनं पोलिसांसमोर जबाबही नोंदवला होता.