कल्याण: दुसरीत शिकणा-या अल्पवयीन मुलीवर सलग 8 महिने सामूहिक बलात्कार, आरोपींमध्ये 2 दुकानमालक आणि एका केटररचा समावेश
Image Used for Representational Image Only | (Photo Credits: Latestly/Illustration)

कल्याणमध्ये (Kalyan) माणुसकीला काळिमा फासणारी खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सात वर्षांच्या मुलीवर सलग 8 महिने सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली असून यात क्रूर कृत्यात 2 दुकानमालक आणि एका केटररचा समावेश आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या तिघा नराधमांना अटक केली असून पुढील तपास करत आहे. लोकसत्ता ने दिलेल्या वृत्तानुसार, या मुलीला तिच्या शाळेजवळ असलेल्या निर्मनुष्य आणि बंद पडलेल्या इमारतीत आरोपी सलग 8 महिने तिच्यावर सामूहिक बलात्कार करत होते असे पोलीस तपासात आढळून आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या पालकांनी शाळेतून घरी येण्यासाठी रिक्षा भाड्याने घेतली होती. पीडित मुलगी शाळा सुटल्यानंतर रिक्षाची वाट पाहत शाळेबाहेर उभी असायची. नेमका याचाच फायदा आरोपी नवीन, अजय आणि विक्रम पुरोहित यांनी घेतला. नवीन याचं कपड्याचं दुकान असून अजय याचा केटरिंगचा व्यवसाय आहे. तर विक्रम हा बॅग विकण्याचा व्यवसाय करतो.

हेही वाचा- सोलापूर: अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन बलात्कार, निर्मनुष्य स्थळी नेऊन वारंवार केला तिच्यावर बलात्कार

पीडित मुलीच्या आजीला वागण्यात बदल जाणवल्यानतंर ही घटना उघडकीस आली. आजीने मुलीकडे चौकशी केली असता तिने घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. शाळा सुटल्यानंतर तीन लोक आपल्याला निर्जनस्थळी खेळण्यासाठी घेऊन जातात असं मुलीने आजीला सांगितल्यानंतर त्यांना धक्काच बसला. त्यांनी तात्काळ आपला मुलगा आणि सुनेला या प्रकाराबद्दल सांगितलं. मुलीच्या पालकांनी ताबडतोब बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तीनही आरोपींना अटक करण्यात आली असून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलीस अधिक तपास करत आहेत. तसेच अशा धक्कादायक प्रकारामुळे शाळकरी मुलींच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.