मुंबई: ऑन ड्युटी असताना मद्यधुंद पोलिसाने बंदुकीतल्या 30 गोळ्या हरवल्या; 5 तासाच्या मोहिमेनंतर लागला शोध
Alcohol Hangover (Photo Credits: Pixabay)

मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) शिरपेचात नेहमीच अभिमानस्पद तुरे जोडले जात असतात मात्र एका दारुड्या पोलिसाच्या बेजबाबदारीमुळे सर्वांची मान खाली गेली आहे. राजन धुळे (Rajan Dhule) असे या पोलिसाचे नाव असून ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आहेत. धुळे यांना काल रात्री आमदार भाई जगताप (Bhai Jagtap)  यांच्या सुरक्षेसाठी कार्टर रोड येथील निवासस्थानी ड्युटी होती, याठिकाणी जात असताना त्यांच्याकडे तीस गोळ्या असणारी एक बॅग होती. वांद्रे पश्चिमेकडील ताज लँडस एंड येथील बसस्टॉप समोर त्यांच्याकडून ही 30 गोळ्या असणारी बॅग हरवली. ही बाबदेखील त्यांना बऱ्याच वेळाने साधारण रात्री 9.45 वाजता लक्षात आली त्यानंतर त्यांनी जवळच्या वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. यानंतर वांद्रे पोलिसांच्या (Bandra Police) सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून तब्बल साडे पाच तास शोधाशोध केल्यावर अखेरीस ही बॅग सापडली.  दारूची झिंग उतरविण्यासाठी कामी येतील हे '5' झटपट उपाय

प्राप्त माहितीनुसार,वांद्रे पोलिसांच्या टीमने पहाटे 2 वाजेपर्यंत कार्टर रोडपासून ते वांद्रे ताज लँड परिसरातपर्यंत शोधाशोध केली. पाच तासाच्या प्रयत्नानंतर अखेर त्यांना ही बॅग ताज लँडस येथील वांद्रे बस डेपोजवळ सापडली. या बॅगेत हरवलेल्या 30 गोळ्या असल्याने अखेरीस सर्वानी सुटकेचा श्वास टाकला. पोलिसांच्या माहितीत धुळे हे ऑन ड्युटी असताना दारू प्यायलेले होते. या परिसरात असणाऱ्या सीसीटीव्ही चे फुटेज तपासल्यावर त्यातही धुळे हे डुलत डुलत चालताना दिसले होते. ताज लँड्स जवळच्याच बस डेपोसमोर बॅग बाजूला ठेवून धुळे बसले होते.

दरम्यान, कर्तव्यावर असताना निष्काळजीपणा केल्याप्रकरणी या पोलिसावर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं आहे.  पुढील कारवाईसाठी पोलिस आयुक्तांकडे त्यांचा अहवाल पाठवण्यात आला आहे.