Mumbai Murder Case: दक्षिण मुंबई च्या  Nepean Sea Road वरील इमारतीत व्यावसायिकाच्या 63 वर्षीय पत्नीची गळा आवळून हत्या, नोकरावर संशयाची सुई
Murder Representational Image (Photo Credits: Pixabay)

दक्षिण मुंबई मधील उच्चभ्रू समजला जाणारा Nepean Sea Road भागात एका सोसायटीत 63 वर्षीय महिलेची घरात गळा आवळून हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. Tahnee Heights मधील ही घटना असून मृत महिलेचं नाव ज्योती शाह आहे. ज्योतीचे पती मुकेश शाह एका ज्वेलरी शोरूमचे मालक आहेत. सध्या पोलिसांनी या हत्येप्रकरणी कलम 302 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.

Nepean Sea Road हा दक्षिण मुंबई मधील उच्चभ्रू भाग आहे. या भागात अनेक राजकीय मंडळी, व्यापारी राहतात. पोलिसांचा ज्योती शाह यांच्या मृत्यू प्रकरणात घरातील नोकर मंडळींवर संशय आहे. मुकेश आणि ज्योती वयोवृद्ध असल्याने त्यांनी घरातील कामाचा भार हलका करण्यासाठी घरात मदतीला नोकर ठेवले होते. ज्योति यांच्या हत्येपासून घरातील नोकर देखील बेपत्ता आहेत. मलबार हिल पोलिसांकडून आजूबाजूला, वॉचमनकडे तसेच शाह यांच्या कुटुंबाकडे देखील चौकशी सुरू आहे. इमारतीच्या सीसीटीव्ही फूटेज वरूनही तपास सुरू आहे. फूटेज मध्ये नोकर इमारतीच्या बाहेर गेल्याचं पहायला मिळालं आहे. Mumbai Shocker: मुलीच्या अफेअर वरून माय-लेकीत टोकाचा वाद; आईने केली पोटच्या मुलीची गळा दाबून हत्या.

Tahnee Heights च्या 20 व्या मजल्यावर शाह दाम्पत्य राहत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाह दुपारच्या सुमारास कामावर गेले. दुपारी 3 च्या सुमारास त्यांनी पत्नी फोन केला पण तिच्याकडून काहीच उत्तर येत नसल्याने मुकेश बैचेन झाले आणि घरी परतले. घरात बेडरूम मध्ये पत्नी निश्चल अवस्थेमध्ये होती. मुकेश यांनी तातडीने तिला हॉस्पिटल मध्ये नेले पण तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केले.

खार मध्येही काही दिवसांपूर्वी दागिने घडवणार्‍या एका महिलेच्या घरामध्ये हाऊस हेल्प असलेल्या किशोरवयीन मुलांनी मालकीणीला जेवणातून गुंगीचं औषध देऊन घरातून 50 लाखांचे हिरे लंपास केले होते.