Cyclone Tauktae च्या पार्श्वभूमीवर मुंबई पालिका प्रशासन सज्ज- महापौर किशोरी पेडणेकर
Mumbai Mayor Kishori Pednekar (Photo Credits: ANI)

अरबी समुद्रातील (Arabian Sea) तोत्के चक्रीवादळाच्या (Cyclone Tauktae) पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) सज्ज असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तयारीची माहिती देखील त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. समुद्र किनाऱ्या लगतच्या जागा निर्मनुष्य करण्याचं काम सुरु आहे. एनडीआरएफ, नेव्ही आणि अग्निशमन दलाची टीम किनाऱ्यालगत सज्ज आहेत. त्याचबरोबर किनाऱ्या नजिक असलेल्या 394 हून अधिक झाडांची छाटणी करण्यात आली आहे. तसंच ज्या ठिकाणी पाणी शिरण्याची शक्यता आहे त्याठिकाणी पंपाची व्यवस्था करण्यात आल्याचेही महापौरांनी सांगितले.

मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर 100 लाईफगार्ड्स तैनात करण्यात आले आहेत. 24 विभागीय नियंत्रण कक्ष सुविधांसह सुसज्ज करण्यात आली असून 6 चौपाट्यांवर आपात्कालीन पथकं तैनात करण्यात आली आहेत. तसंच सुरक्षेसाठी वीजपुरवठा खंडीत करण्यात येण्याची शक्यता असल्याचेही महापौरांनी सांगितले. तसंच वांद्रे-वरळी सीलिंक वाहतुकीसाठी दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना हलवण्याबाबत विचार सुरु असल्याचंही त्या म्हणाल्या. (Cyclone Tauktae च्या पार्श्वभूमीवर मनुष्यबळ, साधनसामुग्री तयार ठेवा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रशासनाला सूचना)

ANI Tweet:

 

तोत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील केवळ 2-3 खाजगी लसीकरण केंद्र वगळता इतर केंद्र दोन दिवस बंद राहणार आहेत. सध्या कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसचे लाभार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि इतर आजार असलेले नागरिक यांना लसीकरणात प्राधान्यक्रम देण्यात येत आहे. त्यामुळे 18-44 वयोगटातील लसीकरण तुर्तास बंदच असल्याचे महापौरांनी सांगितले. दरम्यान, नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.