म्हाडा मुंबई विभागीय मंडळाच्या (Mumbai MHADA 2023 Lottery) 4082 घरांच्या सोडतीच्या अर्जविक्री आणि स्वीकृती प्रक्रियेला 10 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्याचा विचार करत आहेत. त्याचा प्रस्ताव म्हाडा उपाध्यक्षांकडे देण्यात आला असून त्याला मंजुरी मिळाल्यानंतर अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचं वृत्त लोकसत्ताने दिलं आहे. अर्जविक्री आणि ते स्वीकारण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ दिल्यानंतर सोडत देखील लांबणीवर पडणार असल्याचा अंदाज आहे. 18 जुलै दिवशी होणारी सोडत आता जुलै महिन्याच्या शेवटाला किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला होणार असल्याची माहिती आहे.
मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी 22 मे पासून अर्जविक्री आणि फॉर्म स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नवे बदल केल्यानंतर संगणकीय प्रणाली सह सोडत काढण्याची ही पहिलीच वेळ आहे. नव्या प्रक्रियेनुसार अर्ज सादर करण्यासाठी कागदपत्रांची करावी लागणारी जुळवाजुळव आणि अपेक्षित प्रतिसाद नसल्याने आता ही मुदतवाढ देण्यात आल्याचा अंदाज आहे. नक्की वाचा: Mumbai MHADA Lottery 2023: मुंबईत म्हाडा चार हजार घरांसाठी काढणार सोडत, गोरेगाव येथे 2, 638 घरांचा प्रकल्प, जाणून घ्या, सविस्तर माहिती .
मुंबई मध्ये विक्रोळी, सायन, ताडदेव, दादर,गोरेगाव अशा भागांमध्ये विविध गटांसाठी घरं उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतू गट आणि घरांच्या किंमती यामध्ये तफावत आहे. अनेक घरांच्या किंमती सामान्यांच्या आवाक्याच्या पलिकडे असल्याने या लॉटरीला कमी प्रतिसाद असल्याचं सांगितलं जात आहे. 2019 नंतर चार वर्ष मुंबईकर घरांच्या लॉटरीसाठी वाट पाहत होते पण अनेकांचा हिरमोड झालेला आहे.