मुंबई मेट्रो (Photo Credits: ANI)

मुंबई मध्ये मागील वर्षी आरे जंगलामध्ये मेट्रो कार शेड (Metro Car Shed)  उभं करण्यावरून मोठं आंदोलन छेडण्यात आलं होतं. आता ठाकरे सरकारने हे आरे मधील कार शेड गुंडाळून ते कांजुरमार्ग (Kanjurmarg)  मध्ये हलवण्यात आले आहे अशी आज घोषणा केली आहे.. दरम्यान या नव्या जागेसाठी एकही रूपया खर्च न करता शासकीय जमिन मुंबई मेट्रो कार शेडसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. असे देखील सांगितले. तर आरे जंगल हे सुरक्षित ठेवण्यात आले आहे. मुंबई शहरात आता आरे जंगल हे सुमारे 800 एकर भागामध्ये विस्तीर्ण आणि सुरक्षित असेल. Aarey Forest Case: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची 600 एकर जागा वनासाठी राखीव; महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा.

देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मेट्रो प्रकल्पासाठी आरे जंगलात कार शेड उभारणं प्रस्तावित होते. त्यावेळेस भाजप आणि शिवसेना यांची एकत्र सत्ता असली तरीही शिवसेनेने त्याला खुला विरोध दर्शवला होता. त्यावेळेस अनेक झाडांची कत्तल देखील झाली होती. तेव्हापासूनच सत्तेत आल्यास आरे मध्ये कार शेड होऊ देणार नाही असे शिवसेनेकडून सांगण्यात आले होते. त्यावेळेस पर्यावरणप्रेमींना दिलेला शब्द शिवसेनेने पाळला आहे. सध्या पर्यावरण खातं आदित्य ठाकरे यांच्याकडे आहे. त्यांनी या प्रकल्पासाठी मेहनत घेतली असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे देखील आभार मानले आहेत.

आरे कॉलनीत मेट्रो कारशेड नाही

दरम्यान मुंबई मेट्रो कार शेड आरे कॉलनीमध्ये करण्याच्या योजनेत 100 कोटी रूपये वापरण्यात आले आहेत. तर एक इमारत देखील उभारण्यात आली आहे. ही इमारत आता इतर कामासाठी वापरली जाईल. तर मार्गिकांचे एकत्रिकरण केले जाईल असे देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच मागील वर्षी आंदोलनादरम्यान ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते देखील आता मागे घेण्यात आले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.