Mumbai Metro 3: अखेर 6 वर्षानंतर लवकरच सुरु होणार मुंबई मेट्रो 3 चा पहिला टप्पा; दुसऱ्या टप्प्याच्या ट्रायलचे कामही प्रगतीपथावर
Metro (PC- Wikimedia Commons)

Mumbai Metro 3: बांधकाम सुरु होऊन जवळजवळ साडे सहा वर्षानंतर, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (MMRC) मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रोच्या (Mumbai Mtero 3) दुसऱ्या टप्प्यातील ट्रायल रन सुरू करण्याच्या योजनेवर काम सुरू केले आहे. एमएसआरसीच्या म्हणण्यानुसार येत्या काही आठवड्यांत मेट्रोची चाचणी बीकेसी ऐवजी वरळीपर्यंत सुरू केली जाईल. वरळीपर्यंत मेट्रो धावण्यासाठी ट्रॅक टाकण्याचे काम फार पूर्वीच झाले आहे. मार्गावर इतर उपकरणे बसविण्याचे कामही जवळपास पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीपासून आरे आणि बीकेसी दरम्यान मेट्रो-3 ची एकात्मिक चाचणी सुरू आहे. पहिल्या टप्प्यात मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या येत्या दोन महिन्यांत मिळणे अपेक्षित आहे.

एमएसआरसीच्या अधिकाऱ्यानुसार, आरे ते बीकेसी दरम्यान ट्रायल रनची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सध्या ट्रेनमध्ये वजनदार वजने टाकून ट्रेन आणि मार्ग तपासण्याचे काम सुरू आहे. यावेळी ताशी 95 किलोमीटर वेगाने मेट्रो धावत असून, त्यातील सर्व उपकरणे तपासली जात आहेत. मेट्रो धावण्यासोबतच सिग्नलिंग सिस्टीम, टेलिकम्युनिकेशन, प्लॅटफॉर्म स्क्रीन डोअर आणि ट्रॅकच्या टेस्टिंगचे कामही सुरू आहे. लवकरच मेट्रो मार्गाच्या थर्ड पार्टी इन्स्पेक्शनची प्रक्रिया होणार आहे. यानंतर अंतिम चाचणीसाठी मेट्रो रेल सेफ्टी बोर्ड (CSRS) ला आमंत्रित केले जाईल.

मेट्रो 3 च्या पहिल्या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण झाल्यानंतर, मेट्रो प्रशासनाने दुसऱ्या टप्प्याच्या कामाला गती दिली आहे. पहिल्या टप्प्यात 9 गाड्यांसह सेवा सुरू करण्यात येणार आहे. सर्व 9 गाड्यांच्या तपासणीचे काम पूर्ण झाले आहे. एमएसआरसीच्या मते, दुसऱ्या टप्प्यात मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी अतिरिक्त 11 मेट्रो ट्रेन मुंबईत पोहोचल्या आहेत. अतिरिक्त 11 गाड्यांच्या चाचणीचे कामही सुरू करण्यात आले आहे.

आरे ते कुलाबा दरम्यान भूमिगत मेट्रो तीन टप्प्यात उपलब्ध होणार आहे. संपूर्ण मार्गावर बोगदा तयार करणे आणि ट्रॅक टाकण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. संपूर्ण मार्गावर उपकरणे बसविण्याचे काम सुरू आहे. संपूर्ण मेट्रो मार्गाचे जवळपास 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. (हेही वाचा: Mumbai Local Train Murder Case: भरधाव रेल्वेत थरारक, 55 वर्षीय प्रवाशावर जीवघेणा हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू)

पहिल्या टप्प्यात आरे ते बीकेसी, दुसऱ्या टप्प्यात बीकेसी ते वरळी आणि तिसऱ्या टप्प्यात वरळी ते कुलाबा दरम्यान मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. जुलैपर्यंत पहिल्या टप्प्यात मेट्रो सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. संपूर्ण मार्गावरील सेवा 2024 च्या उत्तरार्धात किंवा 2025 च्या सुरुवातीला सुरू होण्याची अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यात सीप्झ ते बीकेसीपर्यंत आठ स्थानके असतील, तर दुसऱ्या टप्प्यात धारावी ते वरळीपर्यंत सहा स्थानके असतील. तिसऱ्या टप्प्यात वरळी आणि कफ परेड दरम्यान 11 स्थानके असतील.