मुंबई: अ‍ॅन्टॉप हिल येथील गरीब नवाज परिसरात स्थानिकांनी मास्क न घालण्यावरुन वाद झाल्यानंतर पोलिसांवर धारदार शस्राने हल्ला, 3 कर्मचारी जखमी
Police| (Photo Credits: Maharashtra Police Twitter)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस कायम राहणार आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांवर वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स यांच्याकडून उपचार करण्यात येत आहे. तसेच पोलीस दलातील कर्मचारी सुद्धा रस्त्यावर गस्त घालून नागरिकांना घरात थांबण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याच दरम्यान आता मुंबईतील अ‍ॅन्टॉप हिल मधील गरीब नवाज परिसरात मास्क न घालण्यावरुन पोलीसांमध्ये आणि काही नागरिकांमध्ये वाद झाला. या दोघांमधील वाद ऐवढा चिघळला की पोलिसांवर धारधार शस्राने हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी 3 कर्मचारी जखमी झाले आहेत.

पोलीस आणि राज्य राखीव पोलीस यांच्यामध्ये मास्क घालण्यावरुन वाद झाले. कोकणी आगार परिसरात ही घटना घडली असून 10 ते 15 जणांकडून हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये पोलीस शिपायांसह एक पोलीस उपनिरिक्षक जखमी झाला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलीस पीआरओ प्रणय अशोक यांनी माहिती दिली आहे.यापूर्वी सुद्धा अॅन्टॉप हिल येथे पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता.(Maharashtra Police: महाराष्ट्रातील 1,061 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण; 9 जणांचा मृत्यू)

दरम्यान, पोलीस दलातील कर्मचारी सुद्धा आपला जीव धोक्यात घालून कोरोनाच्या परिस्थिती रस्त्यावर अहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. तरीही त्यांच्यावर जीवघेणे हल्ले केले जात असल्याच्या संतापजनक घडना वाढत आहेत. यापूर्वी राज्य सरकारने पोलीस किंवा वैद्यकिय कर्मचाऱ्यांवर हल्ले केल्यास त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला होता. महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे येथे सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने आतातरी नागरिकांनी लॉकडाउनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे अशी अपेक्षा केली जात आहे.