Mumbai Local Update: मुंबई मध्ये पश्चिम रेल्वे मार्गावर 22 नोव्हेंबर पासून धावणार 6 नव्या एसी लोकल
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-ट्वीटर)

मुंबई मध्ये कोविड 19 चं संकट आटोक्यात आल्यानंतर आता जनजीवन पुन्हा सुरळीत होण्यास सुरूवात झाली आहे. मुंबई लोकल ही या शहराची लाईफलाईन आहे. आता पश्चिम रेल्वे (Western Railway) कडून वाढती प्रवासी संख्या पाहता चर्चगेट ते विरार (Churchgate-Virar) या मार्गावर 22 नोव्हेंबर पासून 8 नव्या एसी लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता पश्चिम मार्गावर एकूण एसी लोकलची (AC Local)  संख्या 12 वरून 20 होणार आहे. या 8 नव्या लोकल मध्ये 4 अप आणि 4 डाऊन मार्गावर चालवल्या जातील. अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी 1 लोकल गर्दीच्या वेळेस चालवली जाणार आहे.

पहिली एसी लोकल सकाळी विरार स्थानकातून 8 वाजून 33 मिनिटांनी धावणार आहे. तर शेवटची एससी लोकल चर्चगेट स्थानकातून नाला सोपारा साठी रात्री 8 वाजून 27 मिनिटांनी सुटणार आहे. या नव्या लोकल मुळे पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते वांद्रे दरम्यान धावणार्‍या 2 स्लो लोकल रद्द केल्या आहेत.

नव्या एसी लोकल मध्ये अप मार्गावर विरार- चर्चगेट एक लोकल, बोरिवली ते चर्चगेट दोन लोकल, गोरेगाव ते चर्चगेट एक लोकल धावणार आहे. तर डाऊन मार्गावर चर्चगेट ते नालासोपारा एक, चर्चगेट ते बोरिवली दोन लोकल, आणि चर्चगेट ते गोरेगाव एक लोकल धावणार आहे.

सध्या मुंबईकरांना कोविड लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर 14 दिवसांनी लोकल प्रवासाची मुभा आहे. युनिर्व्हसल पास सोबत आता तिकीट देखील उपलब्ध होत असल्याने अनेकांनी पुन्हा मुंबई लोकलची वाट धरली आहे.