Mumbai Local trains. Image Used For Representational Purpose Only.(Photo Credits: ANI)

कोविड-19 (Covid-19) च्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून लोकलसेवा बंद आहे. सध्या काही ठराविक वेळेत लोकल सेवा सुरु असली तरी त्यातून केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि महिलांनाच प्रवास करण्याची परवानगी आहे. त्यामुळे लोकल अभावी होणाऱ्या त्रासदायक प्रवासातून सुटका मिळवण्यासाठी लोकलसेवा (Local Service) कधी सुरु होणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या संदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोरोना व्हायरसचा संसर्ग नियंत्रणात आल्याने लोकल सेवा सुर करण्याबाबत प्रशासन सकारात्मक पाऊलं उचलत आहे. येत्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत लोकल सेवा सुरु करण्याची तारीख निश्चित करण्यात येईल.

11-12 डिसेंबर रोजी होणाऱ्या या बैठकीत राज्य, महापालिका, रेल्वे अधिकारी सहभागी होणार आहेत. 15 डिसेंबर नंतर लोकल सेवा सुरु करण्याचा प्रशासनाचा मानस असून या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल. या बैठकीत शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन लोकल सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे. (Mumbai Local Update: या आठवड्यातील कोरोनाची स्थिती पाहून मुंबई लोकलसंदर्भातील निर्णय घेऊ, आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली माहिती)

दरम्यान, कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असला तरी पुन्हा तो वाढू नये यासाठी प्रशासन विशेष खबरदारी घेत आहे. तसंच नागरिकांनाही दक्ष राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसंच रेल्वे प्रवासादरम्यानही मास्क वापरणे, सुरक्षित अंतर राखणे यांसारख्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. नियम मोडणाऱ्यांकडून दंड वसुली केली जाईल, असे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान बंद केलेल्या सर्व सेवा-सुविधा काही नियमांच्या आधारे पुर्ववत करण्यात आल्या. मात्र सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा अद्याप सुरु झाली नव्हती. त्यामुळे लोकल सुरु होण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या सर्वांसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 18,32,176 इतका झाला असून त्यापैकी 16,95,208 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 88,537 जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. एकूण 47,357 मृतांची नोंद झाली आहे.