Mumbai Local Jumbo Block: मध्य रेल्वेच्या 72 तासांच्या फास्ट लाईन वरील ब्लॉकच्या पहिल्याच दिवशी स्लो लाईन वर प्रवाशांचा खोळंबा
Mumbai local (Photo Credits: Wikimedia Commons)

मुंबई मध्ये मध्य रेल्वेच्या (Central Railway) आजपासून सुरू झालेल्या 72 तासांच्या जम्बो ब्लॉकमुळे  प्रवाशांना कसरत करत प्रवास करावा लागत आहे. आज ब्लॉकच्या पहिल्या दिवशी कळवा, डोंबिवली स्थानकांत प्रवाशांची मोठी गर्दी पहायला मिळाली आहे. ब्लॉकच्या कारणामुळे सध्या मध्य रेल्वेचं वेळापत्रक गडबडलं आहे.  मध्य रेल्वेच्या फास्ट ट्रॅकवर अनेक लोकल रद्द झाल्या असून स्लो ट्रकवरीलही लोकल फेर्‍या वेळापत्रकानुसार नसल्याने रेल्वे स्थानकासोबतच ट्रेनमधील गर्दी आहे.

दरम्यान लोकल सेवा प्रभावित असली तरीही मुंबईकडे चाकरमान्यांना प्रवास करावा लागत असल्याने त्यांच्यासाठी रेल्वे प्रशासन व पालिका कडून अधिकच्या बस सेवा चालवाव्यात अशी मागणी होत आहे. रेल्वेच्या जम्बो ब्लॉकचं निमित्त साधत अनेक स्थानकांमध्ये रिक्षा चालकांकडूनही अधिकचं भाडं उकळलं जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. सध्या ठाणे पालिकेकडून 205 बससेवा चालवण्यात येत आहेत.  हे देखील नक्की वाचा: Mega Block Update: ठाणे-दिवा जलद मार्गावर 72 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक, एक्सप्रेससह 350 लोकल ट्रेन रद्द .

मध्य रेल्वेने 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान ठाणे- दिवा मार्गिका 5,6 चं काम करण्यासाठी खास 72 तासांचा जम्बो ब्लॉक सुरू केला आहे. या काळात लोकल फेर्‍यांसोबतच कोकणात जाणार्‍या एक्सप्रेस, मेल गाड्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या विकेंडला रेल्वे प्रवास करण्यापूर्वी एकदा विचार नक्की करा.

सध्या कोरोना स्थिती नियंत्रणात असली तरीही अनावश्यक गर्दी टाळण्याचं सोबतच मास्क घालणं, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याचे आवाहन कायम करण्यात आले आहे. पण आता ही गर्दी पाहता सार्‍या नियमांचा फज्जा उडत असल्याचं चित्र आहे.