कल्याण: महाराष्ट्रातील अन्य राज्यात जाण्यासाठी बनावट E-Passes बनवणाऱ्या दोन जणांना पोलिसांकडून अटक
Representational Image (Photo Credits: Facebook)

कल्याण (Kalyan) मधील खडकपाडा येथील पोलिसांनी दोन जणांच्या विरोधात कारवाई केली आहे. त्यामध्ये एका सायबर कॅफे चालवणाऱ्या व्यक्तीचा सुद्धा समावेश आहे. नागरिकांना लॉकडाऊनच्या काळात अन्य राज्यात खासगी वाहनांच्या माध्यमातून जाण्यासाठी यांच्याकडून बनावट ई-पास बनवत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी यांच्याकडून जवळजवळ 20 ई-पास जप्त केले आहेत. प्रमोद भुजबळ आणि कुमावर पवार अशी आरोपींची नावे आहेत.

रविचंद वाघरी नावाच्या व्यक्तीने खडकपाडा येथे असलेल्या सायबर कॅफेत भुजबळ याला त्याला गुजरात मध्ये असलेल्या त्याच्या गावी जायचे असल्याचे सांगितले. त्यावेळी हा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी पुढे असे सांगितले की, भुजबळ याने 1 हजार रुपयाची वाघरी याच्याकडे मागणी केली. तसेच रहिवाशी पत्ताच्या पुरावासंबंधित कागदपत्र देण्यास सांगितले. परंतु उर्वरित काही कागदपत्र जसे एनओसी, वैद्यकिय सर्टिफिकेट त्याला मिळून जाईल असे ही वाघरी याला सांगितले.(Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आज 2682 कोरोना बाधीत रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 62,228 वर)

भुजबळ याने केलेला दावा वाघरी याला थोडा विचित्र वाटल्याने त्याने खडकपाडा येथील स्थानिक पोलिसांना या सायबर कॅफेबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली. पोलिसांना असे कळले की, सायबर कॅफेचा मालक हा वैद्यकिय डॉक्टरांचे सर्टिफिकेट इडिट करुन आणि त्यावरील नाव बदलून नागरिकांना देत होता. तर आरोपी 4 जणांसाठी 1 हजार रुपये उकळत होता. त्याचसोबत चार पेक्षा अधिक व्यक्ती असल्यास त्यांच्याकडून 2 हजार रुपयांची मागणी करत त्यांना महाराष्ट्रातील अन्य राज्यात प्रवास करण्यासाठी ई पास देत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.