Coronavirus | Representative Image (Photo Credit: PTI)

भारतामध्ये जेव्हा कोरोना विषाणूचा (Coronavirus) पहिला रुग्ण आढळला होता, त्यावेळी कोणालाही वाटले नव्हते की या महामारीमध्ये महाराष्ट्र (Maharashtra) राज्य इतके बाधित होईल की, अवघ्या दोन महिन्यात राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 60 हजाराच्या पुढे जाईल. होय, महाराष्ट्र राज्यात आज 2682 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व अशा प्रकारे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या आता 62,228 अशी झाली आहे. आज नवीन 8381 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 26,997 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.

एएनआय ट्वीट -

महाराष्ट्रात जरी सर्वाधिक रुग्ण आढळले असले तरी, सध्या राज्यात एकूण 33,124 सक्रीय रुग्ण आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्रात आत 116 कोरोना विषाणूग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एका दिवसांत होणाऱ्या मृत्यूंमध्ये ही सर्वाधिक संख्या आहे. अशा प्रकारे राज्यात आतापर्यंत एकूण 2098 लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या मुंबई आणि पुणे ही दोन शहरे सर्वाधिक बाधित आहेत. (हेही वाचा: धारावीत आज 41 जणांची कोरोनची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आकडा 1715 वर पोहचला; मुंबई महापालिकेची माहिती)

सरकार अनेक बाजूंनी या संकटाचा सामना करण्यासाठी प्रयत्न करत असूनही, वाढत्या रुग्णसंख्येपुढे हे काम अपुरे पडत आहे. मुंबईतील रुग्णालयांच्या आयसीयूमध्ये रूग्णांसाठी आता थोड्या प्रमाणात बेड शिल्लक आहेत. इन्टेन्सिव्ह केअर युनिट म्हणजेच आयसीयूमध्ये जवळपास 99 टक्के बेड भरले आहेत. 27 मे पर्यंत 645 आयसीयू बेडांपैकी आता फारच थोड्या प्रमाणात बेड रिक्त आहेत.

या विषाणूमुळे देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. गाव, तालुका, जिल्हा ते शहर पातळीवर लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी आणि सोशल डिस्टंन्सींग पाळून कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. महाराष्ट्र सरकारने कोरोना व्हायरस चाचणी करण्यावरही मोठा भर दिला आहे.