मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांपैकी 'हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय' (Vaitarna dam) आज पूर्ण भरले आहे. ज्यानंतर तलावाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून 706.30 क्युसेक या वेगाने जलविसर्ग सुरू आहे. जुलै महिन्यात तुळशी, विहार, मोडक सागर, तानसा हे तलाव भरल्या नंतर आज 'हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय' देखील पूर्ण भरले आहे. यानुसार यंदाच्या पावसाळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी 5 तलाव आतापर्यंत पूर्ण क्षमतेने भरले आहेत. (हेही वाचा - Bhatsa Dam Gate Opens: मुसळधार पावसामुळे भातसासह तानसा, मोडकसागर धरणाचे दरवाजे उघडले; नदीकाठी रहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा (Watch Video))
मुंबई आणि परिसरात गेल्याकाही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही 1,44,736.3 कोटी लीटर (14,47,363 दशलक्ष लीटर) इतकी आहे. आज पहाटे 6 वाजताच्या मोजणीनुसार सर्व 7 तलावांमध्ये मिळून 89.10 टक्के इतका जलसाठा आहे.
जून महिन्यात मुंबई महानगरपालिकेने 10 टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला होता. जून महिन्यात समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता कायम होती. जुलै महिन्यात अनेक दिवस मुसळधार पाऊस झाल्याने तलावांमधील पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील पवई तलाव भरला होता. यामुळे आता मुंबईत लावलेली पाणीकपात रद्द होण्याची शक्यता आहे.