मुंबईकरांसाठी आजपासून इलेक्ट्रिक बस सेवा सुरु, 'या' मार्गावर धावणार
इलेक्ट्रिक बस (Photo Credits-Twitter)

बेस्ट उपक्रमामधील पहिली इलेक्ट्रिक बस (Electric Bus) सेवा मुंबईकरांसाठी आजपासून (9 सप्टेंबर) सुरु होणार आहे. तसेच या बसचा क्रमांक 302 असा ठरवण्यात आला असून सहा वातानुकूलित आणि चार विनावातानुकूलित बस बेस्टच्या ताफ्यात दाखल करण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात बेस्टच्या ताफ्यात दहा इलेक्ट्रिक बसची सोय करण्यात आली आहे.

मुंबईतील पूर्व उपनगरातील प्रतीक्षानगर ते सायन- मुलूंड पर्यंत ही इलेक्ट्रिक बस धावणार आहे. तसेच एलबीएस मार्गावरुन सायन ते कुर्ला, कमानी, घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडूप आणि शेवटचे स्थानक मुलूंड या मार्गावरुन चालवण्यात येणार आहे. इलेक्ट्रिक बससाठी चार्जिंग स्टेशन धारावी बस आगारात करण्यात येणार असून एकदा बस चार्ज केल्यावर संपूर्ण दिवसभर ती सुरु राहण्याची क्षमता त्यामध्ये आहे.(बसचे निश्चित ठिकाण कळणार आता मोबाईलच्या एका क्लिकवर)

त्याचसोबत बसची माहिती देणारे अॅप आजपासून मुंबईकरांच्या सेवेसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यामुळे आता प्रवाशांना बसचा मार्ग, बसची वेळ आणि नजीकच्या बस स्थानकासंदर्भासह अन्य माहिती सुद्धा अॅपच्या माध्यमातून मिळणार आहे. मात्र तिकिट दरासाठी वातानुकूलित बससाठी 6 रुपये प्रति पाच किमी आणि विनावातानुकूलित बससाठी 5 रुपये तिकिटाचे दर ठरवण्यात आले आहे.