धारावीत आज कोरोनाचे नवे 42 रुग्ण तर 4 जणांचा मृत्यू, महापालिकेची माहिती
Coronavirus | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सध्याची परिस्थिती गांभीर्याने घेत घरातच थांबावे असे आवाहन केले जात आहे. तरीही नागरिकांकडून लॉकडाउनच्या आदेशाचे उल्लंघन केले जात आहे. याच दरम्यान, मुंबईतील सर्वाधिक मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत दिवसागणिक नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. तर आज धारावीत आणखी 42 कोरोनाबाधित रुग्ण आणि 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. धारावीत दाटीवाटीने लोकवस्ती असून तेथे सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करणे अशक्य आहे. तरीही तेथे महापालिकेकडून कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्वोतोपरी काळजी घेतली जात आहे.

धारावीत कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 330 वर पोहचला आहे. तर आतापर्यंत 18 जणांचा बळी गेला आहे. धारावी परिसर हा कंन्टेटमेंट झोनमध्ये असून येथे कोणत्याही आस्थापनांना परवानगी नाही आहे. तसेच स्थानिकांना घरोघरी जाऊन अन्नधान्य पुरवले जात आहे. या ठिकाणी पोलिसांचा कडकोड बंदोबस्त असून नागरिकांना घराबाहेर पडण्यास परवानगी नाही आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेने येथील सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण केले होते.(Coronavirus मुळे तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याने मुंबई पोलीस आयुक्तांनी घेतला 'हा' मोठा निर्णय)

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 8 हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे कोरोनाच्या विरोधात लढायचे असल्यास नागरिकांनी नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. देशभरातील वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स कोरोनाबाधित रुग्णांवर अहोरात्र उपचार करत आहेत. ऐवढेच नाही तर पोलिसांचे या काळातील कर्तव्य सुद्धा बहुमोलाचे आहे. प्रत्येक जणाने कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सज्ज व्हायला पाहिजे पण त्यावेळी नियमांचे पालन करणे ही गरजेचे आहे.