Mumbai Cruise Ship Drugs Case: मुंबई पोलीस (Mumbai Police) आपल्यावर पाळत ठेवत असल्याची तक्रार एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी पोलीस राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे केली होती. वानखेडे यांच्या या तक्रारीबाबत प्रसारमाध्यमांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना विचारले. पाटील यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या कोणत्याही सूचना पोलिसांना देण्यात आल्या नाहीत. एनसीबीने मुंबईतील क्रुझवर छापा टाकून काही जणांना अटक केली होती. यात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) आणि त्याच्या काही मित्रांचा समावेश होता. या अटक प्रकरणाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली. दरम्यानत, या कारवाईचे प्रमुख सूत्रधार समीर वानखेडे यांनी केलेल्या आरोपामुळे जोरदार खळबळ उडाली होती.
आर्यन खान याच्या अटकेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एनसीबीवर अनेक आरोप केले आहेत. या आरोपांमुळे एनसीबीची कारवाईवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. तसेच, राष्ट्रवादीने केलेल्या गौप्यस्फोटावरुन राजकारणही रंगले होते. दरम्यान, आता स्वत: समीर वानखेडे यांनच आरोप केल्याने पुन्हा हे आरोप आणि प्रकरण खळबळजनक बनले आहे. (हेही वाचा, Mumbai Cruise Ship Drugs Case: नवाब मलिक यांचे NCB ला आव्हान, 'ते फुटेज जारी करा')
दिलीप वळसे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मुंबई पोलीस दलातील अधिकारी असे काही करत असतील असे मला वाटत नाही. कोणावर वॉच ठेवण्याबाबत तशा सूचनाही कोणाला देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे केल्या जाणाऱ्या आरोपांना आपण फार महत्त्व देत नाही. अतिरीक्त माहिती घेऊन मी त्यावर अधिक बोलेन असेही वळसे पाटील यांनी सांगितले.