मुंबईला (Mumbai) देशाची आर्थिक राजधानी म्हटले जाते. लोक देशभरातून मुंबईमध्ये आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात आणि रमून जातात. पण दुसरीकडे मुंबईवर गुन्हेगारांचे सुद्धा सक्रीय लक्ष असते. त्यामुळे मुंबईमध्ये घडणार्या गुन्ह्यांची संख्या देखील जास्त आहे. दरम्यान, मुंबईतील गुन्हेगारींना चाप बसावा याकरता मुंबई पोलीस सतत प्रयत्नशिल असतात. यातच मुंबईत गुन्हेगारी वृत्तीला आळा घालण्यासाठी मुंबई पोलीसांनी नवी युक्ती शोधून काढली आहे. मुंबईत गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांनी चांगले वर्तन करावे, यासाठी मुंबई पोलिसांनी बॉण्ड भरून घेण्याचा निर्णय घेतला आहे. या कराराचे उल्लंघन करणाऱ्या गुन्हेगाराला 50 लाखांपर्यंतचा दंड भरावा लागणार आहे.
मुंबईमध्ये एकूण 94 पोलीस ठाणे आहेत. या प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील 25 गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. चांगले वर्तन करण्यासाठी या गुन्हेगारांकडून एक बॉण्ड भरून घेण्यात येत आहे. त्यानुसार गुन्हेगाराने एखादा गुन्हा केला किंवा कुठल्याही गुन्ह्यात त्याचा सहभाग आढळल्यास बॉण्डचा भंग म्हणून त्याच्याकडून दंड आकारला जाणार आहे. हा दंड 25 हजारपासून 50 लाखांपर्यंत आहे. याआधी ही रक्कम 5 हजार होती. मात्र, त्यामुळे फारसा फरक न पडल्याने दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे. 94 पोलीस स्टेशनमधून 3 हजार 043 गुन्हेगारांची यादी बनवण्यात आली. अशा यांद्यांवर स्थानिक पोलीस, उपायुक्त लक्ष ठेवणार आहेत. हे देखील वाचा- Cyber Crimes: 'सार्वजनिक वायफाय नेटवर्कवर बँकेचे व्यवहार करू नये'; मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी सायबर गुन्ह्यांविरूद्ध केले सावध
महत्वाचे म्हणजे, करारामधील रकमेची तरतूद बॉण्ड भरणाऱ्याच्या वार्षिक उत्पन्नावर अवलंबून असणार आहे. तसेच त्याची आर्थिक परिस्थितीची सुद्धा चाचणी केली जाणार आहे. ज्यामुळे ही मोहीम नीट राबवता येईल, असे विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले आहे. या करारामुळे मुबंईतील गुन्हेगारी तर कमी होईलच मात्र गुन्हेगारी प्रवृत्तीला ही आळा बसेल, अशी अपेक्षा मुंबई पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे.